coronavirus: ऑलिम्पिक वगळता सर्व राष्ट्रीय शिबिरे स्थगित - रिजिजू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 04:25 AM2020-03-18T04:25:25+5:302020-03-18T04:27:06+5:30
टोकियो आॅलिम्पिकची तयारी करीत असलेल्या खेळाडूंचे शिबिर सुरू राहतील,’ अशी माहिती केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.
नवी दिल्ली : ‘कोरोना विषाणू महामारीमुळे सर्व राष्ट्रीय शिबिरे आगामी आदेशापर्यंत स्थगित करण्यात आलेली आहेत, पण टोकियो आॅलिम्पिकची तयारी करीत असलेल्या खेळाडूंचे शिबिर सुरू राहतील,’ अशी माहिती केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ) आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना घरी पाठविण्याची तयारी करीत आहे.
क्रीडामंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, ‘राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र आणि ‘साइ’ केंद्रावर अकादमीय प्रशिक्षणही स्थगित करण्यात येईल.’ रिजिजूंनी टिष्ट्वट केले, ‘कोरोना महामारीमुळे साइने निर्धारित केलेले सर्व राष्ट्रीय शिबिरे स्थगित राहतील. आॅलिम्पिकची तयारी करीत असलेल्या खेळाडूंचे शिबिरे मात्र सुरू राहतील.’
ते पुढे म्हणाले, ‘राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र आणि एसटीसी आगामी आदेशापर्यंत बंद राहील. हे पाऊल अस्थायी व सावधगिरी म्हणून उचलण्यात आलेले आहे आणि परिस्थिती सुधारल्यानंतर प्रशिक्षण शिबिरे पुन्हा सुरू करण्यात येईल. मी सर्व युवा खेळाडूंना आवाहन करतो की त्याचे वाईट वाटून घेऊ नका. आम्ही परिस्थितीचा आढावा घेऊ आणि लवकरच अकादमीय प्रशिक्षण पुन्हा सुरू करू.’ (वृत्तसंस्था)
साइने स्पष्ट केले की, मंजुरी मिळेपर्यंत आणि बंदीचा निर्णय मागे घेईपर्यंत कुठलीही स्पर्धा, क्रीडा महोत्सव, चर्चासत्र किंवा कार्यशाळेचे अयोजन होणार नाही. खेळाडूंना असुविधा होऊ नये यासाठी होस्टेल सुविधा २० मार्चपर्यंत सुरू राहील. आगामी काही दिवसांमध्ये ज्या खेळाडूंची परीक्षा आहे त्यांना केंद्रावर थांबण्याची आणि परीक्षा देण्याची परवानगी राहील. स्वास्थ्याची काळजी घेताना सर्व प्रक्रियांचे पालन करण्यात येईल आणि स्वगृही परतताना खेळाडूंना विषाणूची लागण होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येईल.’
साइने पुढे म्हटले की, ‘सर्व अन्य प्रशिक्षणार्थ्यांना स्वगृही पाठविण्यात येत आहे. ज्यांचे घर केंद्रापासून ४०० किलोमीटरच्या आत आहे त्यांना एसी थर्डचे तिकीट देण्यात येत आहे. ज्यांचे घर ४०० किलोमीटर अंतरापेक्षा अधिक दूर आहे त्यांना विमान तिकीट देण्यात येईल.’
भारतात आतापर्यंत नेमबाजी विश्वचषक आणि इंडिया ओपन गोल्फ स्पर्धा स्थगित करण्यात आलेल्या आहेत. बॅडमिंटनमध्ये इंडिया ओपन स्पर्धा रद्द करण्यात आलेली आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने खेळाडूंच्या प्रशिक्षण व स्पर्धांबाबत दोन सल्ले दिले होते. मंत्रालयाने म्हटले की, ‘टोकियो आॅलिम्पिक पात्रतेसाठी विदेशात खेळणारे खेळाडू आपला सराव सुरू ठेवतील.’ रिजिजू यांनी स्पष्ट केले की, ‘राष्ट्रीय स्पर्धांवर बंदी नाही, पण त्या स्पर्धा प्रेक्षकांविना होतील. भारतीय अॅथलेटिक्स महासंघ इंडियन ग्रांप्रीचे आयोजन करीत आहे. ही स्पर्धा म्हणजे आॅलिम्पिक पात्रता आहे. ही स्पर्धा २० मार्चपासून प्रारंभ होणार असून प्रेक्षकांविना खेळल्या जाईल.’