coronavirus: सराव सुरू करण्याची परवानगी द्या, क्रीडामंत्रालयाकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 04:30 AM2020-05-12T04:30:56+5:302020-05-12T04:31:46+5:30
कोरोनामुळे भारतीय क्रीडा प्राधिकरणातील खेळाडूंचा सराव मार्चच्या मध्यापासून बंद आहे.
नवी दिल्ली : माजी विश्व चॅम्पियन मीराबाई चानू हिच्यासह देशातील आघाडीच्या भारोत्तोलकांनी सराव सुरू करण्याची मागणी क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे सोमवारी केली. कोरोनामुळे भारतीय क्रीडा प्राधिकरणातील खेळाडूंचा सराव मार्चच्या मध्यापासून बंद आहे.
रिजिजू यांनी साईच्या पतियाळा येथील भारोत्तोलकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यादरम्यान त्यांनी सरावाबाबत मत जाणून घेतले.यावर मीराबाई म्हणाली.‘आम्ही सर्वजण वजन उचलण्याचा सराव सुरू करू इच्छितो.’ कोच विजय शर्मा मीराबाईच्या मताशी सहमत दिसले. दोन महिन्यापासून सराव बंद असल्याने मांसपेशी शिथिल झाल्याचे त्यांचे मत होते. ते म्हणाले,‘ आमचा सराव हॉल प्रशस्त असल्याने फिजिकल डिस्टन्स सहज पाळले जाईल. १७ मेपर्यंत तोडगा निघायला हवा.’ मीराबाई, जेरेमी लालरिनुंगा आणि राष्टÑकुलचा चॅम्पियन सतीश शिवलिंगम यांच्यासह अनेक खेळाडू एनआयएस पतियाळा येथे अडकले आहेत.
रिजिजू यांनी भारोत्तोलकांचे मत इतर खेळांच्या सरावासाठी पूरक ठरणार असल्याचे सांगितले. आॅलिम्पिकच्या दृष्टिकोनातून भारोत्तोलकांनी सराव करण्याची गरज आहे. त्यासाठी आरोग्य सांभाळून सराव सुरू करता येईल का, यादृष्टीने कार्यक्रम आखण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी साईचे महासंचालक संदीप प्रधान, क्रीडा सचिव रवी मित्तल, टॉप्स, भारतीय भारोत्तोलन महासंघांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. (वृत्तसंस्था)