Coronavirus : कोरोनाच्या लाटेत ‘स्विमथॉन’ बुडाली! नोंदणीचे पैसे परत मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 07:23 PM2020-03-16T19:23:23+5:302020-03-16T19:32:52+5:30
Coronavirus : गोव्यातील बायंगिणी या समुद्रकिना-यावर ही स्पर्धा होणार होती.
- सचिन कोरडे
‘कोराना’मुळे क्रीडा क्षेत्रातील विविध स्पर्धा रद्द झाल्या आहेत. या विषाणूचा फटका गोव्यात २८ ते २९ मार्चदरम्यान होणा-या आंतरराष्ट्रीय ‘स्विमथॉन’ स्पर्धेलाही बसला आहे. कोरानाच्या लाटेत यंदाची ही स्पर्धा बुडाली. स्पर्धा रद्द झाल्याची ही पहिलीच वेळ आहे. स्पर्धेचे हे दहावे सत्र होते. स्पर्धेत एकूण ९५३ जलतरणपटूंनी नोंदणी केली होती. या खेळाडूंना आता त्यांचे पैसे परत मिळतील अन्यथा ते दुस-या वर्षी भाग घेऊ शकतील, अशी माहिती आयोजक इलियास पटेल यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
गोव्यातील बायंगिणी या समुद्रकिना-यावर ही स्पर्धा होणार होती. या स्पर्धेसाठी देश-विदेशातील हजाराहून अधिक खेळाडूंनी आगाऊ नोंदणी केली होती. स्पर्धेसंदर्भात मुख्य आयोजक असलेल्या एंड्युरो स्पोटर््सचे संचालक इलियास पटेल यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात दिवसेंदिवस ही स्पर्धा लोकप्रिय होत असून जगभरातील जलतरणपटू या स्पर्धेची वाट पाहत असतात.
खुल्या समुद्रातील ही देशातील एक मुख्य स्पर्धा बनली असल्याचे त्यांनी सांगितले होते. स्पर्धा रद्द झाल्याने जलतरणपटूंची मात्र निराशा झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक प्रणालीनुसार, आम्हाला ही स्पर्धा आयोजित करता येणार नाही. त्यामुळे सोमवारी झालेल्या बैठकीत व्यवस्थापनाने स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही पटेल यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या स्पर्धेत २५० मीटर स्प्रिंट, १ किमी, २ किमी, ५ किमी (हॉफ आॅलिम्पिक) आणि १० किमी (पूर्ण आॅलिम्पिक) अशा गटांचा समावेश होता. यंदा प्रथमच १५ किमी टीम रिले प्रकाराचा समावेश करण्यात आला होता. या प्रकाराला खेळाडूंचा चांगला प्रतिसादही लाभला होता. आंतरराष्ट्रीय सहभागींमध्ये आॅस्ट्रेलिया, युके, जर्मनी, इटली, जपान, नेपाळ, नेदरलँड आणि यूएसए येथील जलतरणपटूंचा समावेश होता.