coronavirus : कोरोनामुळे संपूर्ण क्रीडाविश्व झाले ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 05:13 AM2020-03-21T05:13:36+5:302020-03-21T05:13:39+5:30
कोरोना विषाणूमुळे यंदाची आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली, याशिवाय टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धांसह अनेक डब्ल्यूटीए, एटीपी स्पर्धाही पुढे ढकलण्यात आल्या.
- अयाझ मेमन
(कन्सल्टिंग एडिटर लोकमत)
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे क्रीडाविश्व ठप्प पडले असून, कुठेही कोणतीही स्पर्धा सुरू नाही आणि याची आवश्यकताही होती. जागतिक आरोग्य संस्थेने (डब्ल्यूएचओ) या आजाराला महामारी घोषित केले आहे. यामुळे कुठेही क्रीडा महोत्सव किंवा स्पर्धेचे आयोजन होत नाहीए. कारण क्रीडा स्पर्धांसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते आणि अशा परिस्थितीत संक्रमणाचा धोका खूप मोठा असतो. त्यामुळेच क्रीडाविश्वाने काही दिवस थांबण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचे मला वाटते. अर्थात, हा निर्णयही टप्प्याटप्प्याने झाला. काही स्पर्धा पार पडल्या, तर काही क्रीडा स्पर्धा, सोहळे प्रेक्षकांविना पार पडले. शेवटी प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे, जर कोणी जीवितच राहिला नाही, तर क्रीडा स्पर्धा बघायला येणार कोण? त्यामुळे काही दिवस क्रीडा घडामोडी थांबविण्याचा निर्णय चांगलाच झाला.
कोरोना विषाणूमुळे यंदाची आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली, याशिवाय टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धांसह अनेक डब्ल्यूटीए, एटीपी स्पर्धाही पुढे ढकलण्यात आल्या. क्रिकेटमधील अनेक दौरे, फुटबॉल लीग अशा अनेक स्पर्धा स्थगित करण्यात आल्या. त्यात सर्वात मोठा प्रश्न आहे तो आॅलिम्पिकचा. आॅलिम्पिक वेळेनुसार होणार की नाही? हाच सर्वात मोठा प्रश्न क्रीडाविश्वाला सध्या भेडसावत आहे. २४ जुलैपासून आॅलिम्पिक सुरू होणार असून, त्या आधी कोरोनाची समस्या सुटेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. त्याच वेळी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समिती (आयओए) आणि जपान आॅलिम्पिक समिती दोघांचेही निर्धारित वेळेनुसार आॅलिम्पिक आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण कोरोना विषाणूमुळे संपूर्ण क्रीडाविश्वाचे वेळापत्रक बिघडले आहे.
कोरोना विषाणूने सर्वांनाच चिंतेत टाकले असून, मी स्वत:लाही सर्वांपासून वेगळे ठेवले आहे. या दरम्यान मी काही पुस्तके वाचत आहे, तसेच क्रिकेट आॅस्टेÑलियावर आधारित वेब सीरिजही पाहत आहे. क्रीडाविश्वाची नवी माहिती घेत आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा विषय सर्वांनी अत्यंत गंभीरतेने घ्यावा. सरकारनेही रविवारी ‘जनता कर्फ्यू’चे अवाहन केले आहे. सर्वांनी याचे पालन करावे आणि याचा अर्थ असा नाही होत की, तुम्ही दिवसभरात काहीच करायचे नाही. या दरम्यान आपल्या परिवारासह वेळ घालवा आणि सर्वात महत्त्वाचे समाजामध्ये वावरताना शक्यतो एकमेकांमध्ये अंतर ठेवा. स्वत:ची स्वच्छता राखा. सर्वांनी एकत्रित येऊन स्वत:ची काळजी घेतली, तर नक्कीच हा विषाणू रोखण्यात आपल्याला यश येईल.