CoronaVirus: २०२१ मध्येही टोकियो ऑलिम्पिकची शक्यता कमीच
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 11:40 PM2020-04-20T23:40:23+5:302020-04-20T23:41:37+5:30
कोबे विद्यापीठातील साथीच्या रोगाचे तज्ज्ञ प्रा. केटारो इव्हाटा यांनी, प्रामाणिकपणे सांगायचे तर टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन पुढील वर्षी होईलच, याची शक्यता कमी असल्याचे मत व्यक्त केले.
टोकियो : कोरोना व्हाायरसमुळे वर्षभर लांबणीवर टाकण्यात आलेल्या टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन २०२१ मध्ये होण्याची शक्यता कमीच आहे.
कोरोनावर पूर्णपणे नियंत्रण मिळविणे अवघड होत अवघड होत असल्यामुळे एका तज्ज्ञाने सोमवारी ही भीती व्यक्त केली. कोबे विद्यापीठातील साथीच्या रोगाचे तज्ज्ञ प्रा. केटारो इव्हाटा यांनी, प्रामाणिकपणे सांगायचे तर टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन पुढील वर्षी होईलच, याची शक्यता कमी असल्याचे मत व्यक्त केले. जपान आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने खेळाडू तसेच क्रीडा महासंघांच्या दडपणानंतर मागच्या महिन्यात टोकियो २०२० आॅलिम्पिकचे आयोजन २३ जुलै २०२१ पर्यंत पुढे ढकलले होते. कोरोना व्हायरसने जगभरात थैमान माजवले असून अद्यापही हजारो लोकांचे जीव जात आहेत. लाखो लोकांना या व्हायरसने ग्रासले असून त्यावर नियंत्रण मिळविणारे औषध किंवा लसदेखील उपलब्ध नाही. अशावेळी कोरोनावर मात करायची कशी, अशी समस्या निर्माण झाली. पुढारलेल्या देशातील नागरिक हजारोंच्या संख्येने मृत्युमुखी पडत असल्याने राज्यकर्तेदेखील हतबल झाले आहेत. कोरोनामुळे परस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास पुढच्यावर्षी आॅलिम्पिक होऊ शकणार नाही, असे तज्ज्ञांना वाटते.
इव्हाटा म्हणाले, ‘आॅलिम्पिक आयोजनासाठी दोन अटी आहेत. पहिली अट जपानमध्ये कोरोनावर नियंत्रण यायला हवे. आणि दुसरी अट म्हणजे जगातही कोरोनाचा नायनाट व्हावा, कारण जगभरातून खेळाडू तसेच प्रेक्षक आॅलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहेत.’(वृत्तसंस्था)