coronavirus: अर्जुन पुरस्कारासाठी दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे पंघाल नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 04:55 AM2020-05-16T04:55:56+5:302020-05-16T04:56:11+5:30
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी निवड प्रक्रिया बदलण्याची विनंती केली आणि सध्याची पद्धत भेदभाव करणारी असल्याचे म्हटले.
नवी दिल्ली : आशियन गेम्सचा सुवर्णपदक विजेता बॉक्सर अमित पंघाल याने शुक्रवारी क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी निवड प्रक्रिया बदलण्याची विनंती केली आणि सध्याची पद्धत भेदभाव करणारी असल्याचे म्हटले. वर्ष २०१२ मध्ये अनवधानाने झालेल्या डोपिंगच्या गुन्ह्यामुळे अर्जुन पुरस्कारासाठी सातत्याने त्याला डावलण्यात येत आहे. क्रीडामंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात पंघालने म्हटले की, खेळाडूंनी स्वत: नामांकन करीत अर्ज करायला नको.
गेल्या वर्षी विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक पटकाविणारा भारताचा पहिला पुरुष बॉक्सर ठरलेल्या पंघालने पत्रात म्हटले की, ‘सध्याच्या प्रक्रियेनुसार एका खेळाडूला अर्ज करता येतो आणि त्यानंतर क्रीडा समिती या अर्जाच्या आधारावर निवड करते. पुरस्कार निवडीमध्ये क्रीडा समितीतील सदस्यांतर्फे भेदभाव करणारे निर्णय होतात. त्यासाठी त्यांना कुणाला उत्तरही द्यावे लागत नाही.’ पंघालची दोनवेळा अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस झालेली आहे, पण डोपिंग नियमाचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्या नावावर विचार झालेला नव्हता. (वृत्तसंस्था)
‘जगातील प्रतिष्ठेचे जास्तीत जास्त पुरस्कार नामांकनाचा विचार न करता देण्यात येतात. कारण योग्य विचार केला तर पुरस्कार हा खेळाडूच्या कामगिरीचा सन्मान आहे. सध्याची प्रक्रिया ब्रिटिश काळातील जुन्या प्रक्रियेप्रमाणे आहे. येथे चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूला स्वत:चा पुरस्कारासाठी अर्ज करावा लागतो. जर या पुरस्कारांना नामांकन मुक्त करण्यात आले तर तुम्ही भारतीय क्रीडा प्रक्रियेमध्ये सकारात्मक बदल कराल. या बदलाचा विचार करावा, ही विनंती. मी तुमचा आभारी असेन.’
- अमित पंघाल