coronavirus: कोरोनापासून खेळाडूंचा बचाव करावा लागेल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 04:27 AM2020-05-11T04:27:59+5:302020-05-11T04:28:14+5:30
एक योजना आखण्यात येत आहे. जर अव्वल खेळाडूला काही झाले तर मोठा धक्का बसेल. त्यामुळे आपल्याला सावधगिरी बाळगावी लागेल.
नवी दिल्ली : भारताच्या मुख्य केंद्रांमध्ये आऊटडोअर सरावाला सुरुवात करण्याची योजना तयार करण्यात असून क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटले की, खेळाडूंना कोविड-१९ व्हायरसची लागण होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल.
रिजिजू म्हणाले,‘एक योजना आखण्यात येत आहे. जर अव्वल खेळाडूला काही झाले तर मोठा धक्का बसेल. त्यामुळे आपल्याला सावधगिरी बाळगावी लागेल. सध्यातरी खेळाडूंपैकी कुणालाही कोरोनाची लागण झालेली नाही. खेळाडू आपल्या देशाचा गौरव आहेत आणि कुठलीही जोखिम पत्करू शकत नाही.’
रिजिजू पुढे म्हणाले,‘सर्व खेळाडू व प्रशिक्षकांची काळजी घेण्यात येईल. विदेशी प्रशिक्षकांचा वेगळ्या पद्धतीने वापर करण्यात येईल. त्यांना वेतन देण्यात येत आहे. या अडचणीच्या समयी कुणाचेही वेतन थांबविण्यात येणार नाही.
उदयोन्मुख खेळाडू स्वगृही परतले आहेत. त्यांना परत बोलविण्यात येईल. सरकार राष्ट्रीय क्रीडा महासंघाचीही मदत घेईल. केवळ खेळच नाही तर सामन्या जीवनही बदलले आहे. खेळही नव्या पद्धतीने पुढे वाटचाल करतील. आम्हाला प्रेक्षकांविना खेळ रंगतदार बनविण्याची योजना आखावी लागेल. भविष्यात स्टेडियम प्रेक्षकांविना असतील. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये अमाप पैसा आहे. त्यांना प्रसारण अधिकार करारातून पैसा मिळतो, पण अन्य खेळांना मदतीची गरज आहे. आम्ही त्या खेळांना व महासंघांना मदत करू.’ (वृत्तसंस्था)
प्रशिक्षण सुरू करण्याासाठी साईतर्फे समितीचे गठन
भारतीय क्रीडा प्राधिकरणने कोरोना व्हायरसमुळे देशभरात असलेले लॉकडाऊन संपल्यानंतर सर्व केंद्रांवर खेळासोबत जुळलेले प्रशिक्षण सुरू करण्यासाठी एक योग्य संचालन प्रक्रिया (एसओपी) तयार करण्यासाठी सहा सदस्यांच्या समितीचे गठन केले आहे. या सहा सदस्यांच्या समितीची अध्यक्षता साईचे सचिव रोहित भारद्वाज करतील तर टार्गेट आॅलिम्पिक पोडियम स्किमचे (टॉप्स) मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राजगोपालन, कार्यकारी संचालक (परिचालन) एस.एस. रॉय, एस.एस. सरला, कर्नल बी.के. नायक आणि टॉप्सचे सहायक संचालक सचिन के. समितीचे अन्य सदस्य आहेत.
कोविड-१९ महामारीमुळे साईच्या सर्व केंद्रात सराव व प्रशिक्षण ठप्प आहे. समिती एसओपीचा मसुदा तयार करेल. त्यात प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर या महामारीपासून बचावाचे उपाय असतील. प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षक, तांत्रिक व बिगर तांत्रिक सहायता कर्मचारी, एनएसएफ (राष्ट्रीय क्रीडा महासंघ), प्रशासकांव्यतिरिक्त भोजनालय व वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना या मसुद्यानुसार कार्य करावे लागेल. परिसरात प्रवेश करणारे चाहते व खेळासोबत जुळलेल्या भागधारकांनाही या मसुद्याचे पालन करावे लागेल. समितीच्या शिफारशी संबंधित एनएफएस व अन्य भागधारकांसोबत चर्चा केल्यानंतर तयार करण्यात येईल. अंतिम मंजुरीसाठी हा मसुदा क्रीडा मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल. सर्व एनएसएफला महामारीपासून बचावांच्या उपयांसाठी आपल्या शिफारशी शेअर करण्याची सूचना देण्यात आलेली आहे. त्यात जलतरण क्रीडा प्रकारासाठी वेगळी समिती स्थापन करण्यात आलेली आहे.