टी-२० चे काउंटडाऊन...
By Admin | Published: January 28, 2017 12:39 AM2017-01-28T00:39:07+5:302017-01-28T00:39:07+5:30
वारंवार सूचित करूनही विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (व्हीसीए) पदाधिकाऱ्यांकडून सुरक्षेच्या अनुषंगाने अत्यावश्यक बाबींची पूर्तता करण्यात आलेली नाही.
नरेश डोंगरे / नागपूर
वारंवार सूचित करूनही विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (व्हीसीए) पदाधिकाऱ्यांकडून सुरक्षेच्या अनुषंगाने अत्यावश्यक बाबींची पूर्तता करण्यात आलेली नाही. क्रिकेट सामना काही तासांवर आला असूनदेखिल व्हीसीए पदाधिकाऱ्यांकडून सुरक्षेसंबंधाने चालढकल केली जात असल्याने पोलीस प्रशासनाचा रक्तदाब चांगलाच वाढला आहे.
व्हीसीएच्या जामठा स्टेडियमवर २९ जानेवारीला भारत विरुद्ध इंग्लंडदरम्यान टी-२० सामना होणार आहे. नागपूर हे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. येथे घातपात करण्यासाठी दहशतवादी संधीची वाट बघत आहेत. त्यामुळे ठोस नसला तरी गुप्तचर यंत्रणांकडून नागपूरला नेहमीच अलर्ट असतो.
रविवारी होऊ पाहणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना त्याचमुळे संवेदनशील ठरला आहे. हा सामना चुरशीचा होईल, अशी अपेक्षा आहे. अवघ्या काही वेळात सामन्याची आॅनलाईन तिकीट विक्री बंद झाल्याने देश-विदेशातील क्रिकेट रसिकांची जामठ्यावर गर्दी उसळणार असल्याचा अंदाज आहे. ते लक्षात घेता पोलिसांनी खबरदारीच्या विविध उपाययोजना केल्या आहेत. मैदानात क्रिकेट सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीपासून तो सामना संपेपर्यंत आत-बाहेर कसलाही धोका होऊ नये, यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सुरक्षेची प्रत्येक बाब तावून सुलाखून बघितली जात आहे.
याउलट व्हीसीएकडून सुरक्षेचा मुद्दा वाऱ्यावर सोडल्याचा समज झाल्याने पोलीस अधिकारी त्रागा व्यक्त करीत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सामन्याच्या वेळी व्हीसीएतर्फे स्टेडियमच्या आत-बाहेर कामगार आणि कर्मचारी ठेवले जाणार आहेत. ते किती आणि कोणकोण राहणार, त्याची यादी पोलिसांनी मागितली आहे. मात्र, अद्याप ती पोलिसांना मिळालेली नाही.
कोणत्या कामासाठी कोणता कंत्राटदार आणि व्हेंडर आहे, त्याचीही माहिती, संपर्क क्रमांक पोलिसांना मिळालेले नाहीत. पोलिसांना ही यादी लवकर मिळाल्यास ‘त्या’ सर्व व्यक्तींची पोलीस चौकशी, शहानिशा करू शकतात. तसे अद्याप काहीही झालेले नाही. त्यामुळे व्हेंडर, कर्मचारी-कामगारांच्या नावावर कुणीही आत-बाहेर वावरण्याचा धोका आहे. दुर्दैवाने असे काही घडले अन् बनावट ओळखपत्राच्या आधारे भलताच कुणी आतमध्ये शिरल्यास काय करायचे, हा प्रश्न पोलिसांची झोपमोड करणारा ठरला आहे. सामन्याला अवघे काही तास उरले असताना अत्यावश्यक असे अग्निशमन यंत्रणेचे (फायर, मुंबई) प्रमाणपत्र पोलिसांना मिळालेले नाही. स्टेडियमची क्षमता अन् प्रेक्षक मर्यादेविषयक आलबेल असल्याचे प्रमाणपत्रही सार्वजनिक बांधकाम खात्याकडून पोलिसांना मिळाले नसल्याचे सांगितले जाते. याशिवायही सुरक्षेच्या अनेक बाबींची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनात अस्वस्थता आहे.
---
पोलिसांची मुस्कटदाबी
सामन्याच्या वेळी, अगोदर अथवा नंतर सुरक्षेच्या संबंधाने कोणतीही चूक झाल्यास पोलिसांवरच खापर फुटणार आहे. तिकडे व्हीसीएच्या पदाधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद मिळत नाही. व्हीसीए सारख्या प्रभावी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत पोलीस ‘आवाज‘ मोठा करून बोलू शकत नाही. त्यामुळे सामन्याच्या आणि खेळाडूंसोबतच हजारो प्रेक्षकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलीस प्रशासनाची मुस्कटदाबी होत असल्याचा अनुभव आम्ही घेत असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे मत आहे.