पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 03:57 AM2020-12-15T03:57:20+5:302020-12-15T03:58:25+5:30
दिल्ली काबीज करणारा चित्ता काळाच्या पडद्याआड
n लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : चित्त्याची चपळाई, आक्रमक कुस्तीच्या जोरावर उत्तरेतील प्रसिद्ध मल्ल रुस्तम-ए-पंजाब बत्तासिंग याला चितपट करून भारताचे पहिले हिंदकेसरी बनलेले श्रीपती शंकर खंचनाळे (वय ८६, रा. रुईकर कॉलनी, कोल्हापूर) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी पहाटे उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात निधन झाले.
‘सारे जीवन लाल मातीतील कुस्तीला वाहून घेतलेला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर धडक दिलेला नामांकित मल्ल’ अशी खंचनाळे यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने कुस्तीतील जिगरबाज हिरा कायमचा लुप्त झाला. नवी दिल्लीत ३ मे १९५९ ला झालेल्या लढतीत बत्तासिंगला चितपट करून ते हिंदकेसरी झाले होते. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद हे ही लढत पाहण्यास आवर्जून उपस्थित होते.
उमेदीतील प्रचंड व्यायामामुळे सारे शरीर खिळखिळे झाल्याने गेल्या काही दिवसापासून त्यांना कंबरदुखीचा त्रास होता. त्यातच वृद्धापकाळाने आलेल्या व्याधीमुळे त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या पश्चात पत्नी शांता, मुले सत्यजित, रोहित आणि विवाहित मुलगी पौर्णिमा, जावई, नातवंडे असा परिवार आहे. महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार, तर कर्नाटक शासनाच्या ‘कर्नाटक भूषण’ पुरस्काराने त्यांचा गौरव झाला होता. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांनीही त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली होती. पांढरी विजार, डोक्यावर पांढरी टोपी व अंगात पांढरा सदरा असे त्यांचे अत्यंत साधे राहणीमान होते.
खंचनाळे मूळचे कर्नाटकातील एकसंबा(ता. चिक्कोडी, बेळगाव)चे. त्यांचे वडीलही पैलवान होते. त्यांनी या मुलातील कुस्तीची ओढ ओळखून त्यांना कोल्हापुरातील शाहूपुरी तालमीत पाठविले व कोल्हापूर हीच खंचनाळे यांची कर्मभूमी ठरली. पंचक्रोशीतील कुस्त्या जिंकून त्यांनी चांगलेच नाव कमावले होते. शाहूपुरी तालमीत आल्यावर वस्ताद हसनबापू तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कुस्तीचे धडे गिरविले. कुस्तीतील भीष्माचार्य विष्णू नागराळे, मल्लाप्पा थडके यांचाही त्यांच्यावर प्रभाव राहिला. अत्यंत धिप्पाड शरीर, वजन १२८ किलो, रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि प्रतिस्पर्धी मल्लाच्या उरात धडकी भरेल असा करारी बाणा त्यांना लाभला होता. त्या बळावरच त्यांनी महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील नावाजलेल्या मल्लांना अस्मान दाखविले. अत्यंत चपळाईने कुस्ती करणारा मल्ल अशीही त्यांची ओळख होती. ज्या काळात कुस्तीला अलोट प्रेम मिळाले परंतु फारसे आर्थिक पाठबळ मिळत नव्हते, तेव्हा या मल्लाने कुस्ती गाजविली.
शासनाकडून पुरस्कार मिळाले, गौरव झाला, परंतु फारशी आर्थिक मदत त्यांना मिळाली नाही. तथापि, तरीही त्यांनी लाल मातीशी जोडलेली नाळ तुटू दिली नाही. कुस्तीतून निवृत्त झाल्यानंतरही नवे मल्ल घडविण्याचे काम त्यांनी केले. अलीकडील किमान २० वर्षांत त्यांचा तालमीशी संपर्क कमी झाला असला तरी, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या माध्यमातून ते कुस्ती कलेच्या संवर्धनासाठी सक्रिय होते. या संघाचे ते पाच वर्षे अध्यक्षही होते.
सजविलेल्या ट्राॅलीतून अंत्ययात्रा
हिंदकेसरी खंचनाळे यांची दुपारी १२ वाजता त्यांच्या रुईकर काॅलनीतील निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. रुईकर काॅलनी, ताराराणी चौक, स्टेशन रोड, दसरा चौक, वीरशैव लिंगायत रुद्रभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर मान्यवरांच्या उपस्थितीत दफनविधी करण्यात आले. तत्पूर्वी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक बाळ गायकवाड, संघाचे सरचिटणीस ॲड. महादेवराव आडगुळे, हिंदकेसरी विनोद चौगुले, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार निवेदिता माने, महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आदी मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.
आधी हिंदकेसरी... नंतर महाराष्ट्र केसरी
खंचनाळे आधी हिंदकेसरी झाले व त्यानंतर त्याच वर्षी कऱ्हाडला झालेल्या लढतीत अनंत शिरगावकर यांना हरवून ते ‘महाराष्ट्र केसरी’ झाले. त्यांच्या कुस्तीचे वैशिष्ट्य असे की, ते कधीच चितपट झाले नाहीत. करिअरच्या एका टप्प्यावर ते कुस्तीतून आब राखून निवृत्त झाले. त्यानंतरच्या आयुष्यात त्यांनी शेतीत लक्ष घातले. परंतु कुस्तीला बट्टा लागेल, असा व्यवहार त्यांच्याकडून कधीच झाला नाही. ‘खंचनाळे पैलवान’ अशीच त्यांची ओळख कायम राहिली. त्यांचे व्यक्तिमत्त्वच असे होते की, समोर कुणीही आला तरी खंचनाळे यांना नमस्कार केल्याशिवाय तो पुढे जात नसे.