क्रीडासंहितेत क्रिकेटचादेखील समावेश असावा : क्रीडामंत्री
By admin | Published: May 11, 2017 12:41 AM2017-05-11T00:41:41+5:302017-05-11T00:41:41+5:30
केंद्र सरकार नवी क्रीडासंहिता लवकरच लागू करणार असून, क्रिकेटचा समावेश तीत असायला हवा, असे क्रीडामंत्री विजय गोयल यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकार नवी क्रीडासंहिता लवकरच लागू करणार असून, क्रिकेटचा समावेश तीत असायला हवा, असे क्रीडामंत्री विजय गोयल यांनी म्हटले आहे.
न्या. आर. एम. लोढा यांच्या समितीने संवैधानिक बदल सुचविताच सर्वांत श्रीमंत संघटना असलेले भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय) नव्या बदल प्रक्रियेतून जात आहे. बीसीसीआय स्वत:ला क्रीडासंहितेचा भाग मानत नाही. आम्ही शासकीय अनुदान घेत नसल्यामुळे क्रीडाधोरण लागू होत नसल्याचे बीसीसीआयचे मत आहे. गोयल हे बीसीसीआयचे काळजीवाहू अध्यक्ष सी. के. खन्ना यांच्या शेजारी बसले होते. ते पुढे म्हणाले, ‘‘हा प्रश्न केवळ बीसीसीआयपुरता मर्यादित नाही. माझ्या मते, सर्वच खेळ क्रीडासंहितेच्या कार्यकक्षेत असायला हवेत.’’
सध्या क्रीडासंहिता सर्वच खेळांना लागू होते. सर्वच क्रीडा महासंघ क्रीडासंहितेचे पालन करतात. अंतिम अहवाल तयार होताच आम्ही सर्वांसमक्ष तो मांडणार आहोत. नव्या संहितेत सहभागी होण्यास बीसीसीआयचा विरोध असल्याबाबतची माहिती माझ्याकडे नाही, असेही गोयल यांनी सांगितले.
खन्ना यांनी मात्र यावर मतप्रदर्शनास नकार दिला. यावर योग्य वेळी चर्चा करू, इतकेच ते म्हणाले. सध्या मी कुठल्याही बाबीवर मत मांडणार नाही. गोयल यांना आयपीएलच्या अंतिम सामन्याचे निमंत्रण देण्यासाठी मी येथे आलो आहे. योग्य वेळ येताच आम्ही परस्परांमधील दुरावा दूर करू. सध्या तरी अशा प्रकारची चर्चा करण्यासाठी मी आलेलो नाही, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)