क्रिकेट स्टेडियमचा उपयोग टेनिस, हॉकीसाठी करा!
By admin | Published: January 5, 2016 11:56 PM2016-01-05T23:56:18+5:302016-01-05T23:56:18+5:30
क्रिकेटला ‘क्लीन’ आणि पारदर्शी करण्यासाठी न्या. आर. एम. लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशींचा अंमल झाल्यास बीसीसीआयला नागपूर, पुणे, राजकोट येथील
नवी दिल्ली : क्रिकेटला ‘क्लीन’ आणि पारदर्शी करण्यासाठी न्या. आर. एम. लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशींचा अंमल झाल्यास बीसीसीआयला नागपूर, पुणे, राजकोट येथील क्रिकेट स्टेडियममध्ये भारतीय हॉकी संघाचे कसोटी सामने; तसेच डेव्हिस चषकाचे टेनिस सामने खेळवावे लागू शकतात.
‘संविधान आणि सदस्यांची कामे’ या शीर्षकांतर्गत समितीने जी शिफारस केली, त्यात सध्याच्या स्टेडियमवर भाष्य करण्यात आले आहे. या स्टेडियममध्ये अॅस्ट्रोटर्फ टाकून टेनिस आणि हॉकीचे आयोजन करण्यात यावे. यामुळे खेळांचा चौफेर विकास होईल. मूळ खेळपट्टीला धक्का लागणार नाही हे ध्यानात घेतले जावे. तथापि, हजारो लोकांची उपस्थिती असलेले सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन मात्र करण्यात येऊ नये, अशी शिफारस आहे. स्टेडियममध्ये अॅस्ट्रोटर्फ किंवा सिंथेटिक टेनिस कोर्ट तयार करण्याच्या तर्काविषयी बीसीसीआयच्या सीनियर अधिकाऱ्याचे मत जाणून घेतले असता ते म्हणाले, ‘हे शक्य नाही कारण स्टेडियममध्ये एकूण १२ खेळपट्ट्या बनलेल्या असतात.’
खेळपट्टीचे नुकसान होऊ नये, अशी एकीकडे सूचना करण्यात आली तर दुसरीकडे मैदानावर हॉकी आणि टेनिस खेळण्याची व्यवस्था करण्यास सांगण्यात येत आहे. हॉकी मैदानावर सामना सुरू असताना ८० मीटर दूर प्रेक्षक बसल्यास त्यांना सामन्याचा आनंद लुटण्यात अडसर निर्माण होईल, असे हा अधिकारी म्हणाला.
मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये २००६ मध्ये पाकविरुद्ध डेव्हिस चषक सामना खेळविण्यात आल्याची आठवण करून देताच हा अधिकारी म्हणाला, ‘क्रिकेट स्टेडियममध्ये टेनिस खेळविण्याची ती पहिली आणि शेवटची घटना होती. प्रेक्षक आणि खेळाडूंमध्ये इतके अंतर असेल तर खेळ कसा लोकप्रिय होईल. या शिफारशी व्यवहारात उपयुक्त ठरतील काय, हा मोठा प्रश्न आहे.’ (वृत्तसंस्था)