क्रिकेटविश्व ‘यष्टिचीत’!
By admin | Published: December 31, 2014 02:38 AM2014-12-31T02:38:19+5:302014-12-31T02:38:19+5:30
भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मंगळवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा घेतलेला निर्णय सगळ्यांनाच धक्का देणारा ठरला.
धोनीचा कसोटीला गुडबाय! निवृत्तीच्या निर्णयाने सारेच अचंबित!!
विनय नायडू - मुंबई
भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मंगळवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा घेतलेला निर्णय सगळ्यांनाच धक्का देणारा ठरला. मेलबर्न कसोटी अनिर्णित राखल्यानंतर लगेचच त्याने ही निवृत्ती जाहीर केली. त्याच्या ‘यष्टिचीत’ करण्याच्या कौशल्याइतकाच हा निर्णय वेगवान आहे.
गेल्या १० वर्षांच्या दीर्घ ‘कूल अॅण्ड काम’ कारकिर्दीला साजेल असाच त्याचा हा निर्णय आहे. पत्रकार परिषद घेईपर्यंत धोनीच्या या निर्णयाची कोणाला कल्पनाही नव्हती. बीसीसीआयच्या पत्रानंतरच त्याचा खुलासा झाला आणि असे का, या भोवऱ्यातच तो सर्वांना ठेवून गेला. दौरा अर्धवट असताना त्याने हा निर्णय का घेतला? चौथ्या कसोटी सामन्यात त्याची गरज होती, असा सूर अनेकांनी व्यक्त केला. वयाच्या ३३व्या वर्षी निवृत्तीचा निर्णय घेणारा धोनी संघाचे संचालक रवि शास्त्री यांच्यानंतरचा कारकीर्द बहरात असताना निरोप घेणारा दुसरा खेळाडू ठरला. १९९२मध्ये रवि शास्त्री यांनी वयाच्या ३० व्या वर्षी निवृत्ती घेतली होती सूत्रांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, संघात कोणताही बेबनाव नव्हता आणि त्याच्या निवृत्तीबाबत सगळेच अनभिज्ञ होते. धोनीच्या निकटवर्तीयांनी सांगितल्याप्रमाणे, पुढील कर्णधार विराट कोहली आणि सुरेश रैना यांनाच या निर्णयाची थोडीफार कल्पना असावी; कारण या दोघांचे त्याच्याशी घनिष्ठ संबंध होते. मेलबोर्न कसोटी सामन्याचा शेवटचा दिवस संपेपर्यंत त्याच्या निवृत्तीची कुणालाच कल्पना नव्हती. इयान चॅपेल याच्या टिपणीने काहीजणांच्या भुवया मात्र उंचावल्या होत्या. स्मिथ आणि धोनी यांनी हा सामना अनिर्णित राखण्याचे मान्य केल्यानंतर चॅपेल म्हणाले, की धोनी स्मृतिचिन्ह जवळ घेतल्यासारखा ‘यष्टी’ का उचलतो? त्याने एक स्टंम्प कसोटीची आठवण म्हणून सोबत घेतला. धोनीच्या या निर्णयाने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आत्ताच का? दौरा संपल्यानंतर का नाही? दहा कसोटीनंतर तो कसोटीचे शतक साजरे करणार होता. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये ५००० धावा पूर्ण करण्यासाठी त्याला केवळ १२४ धावांची आवश्यकता होती. अर्थात तो कधी विक्रमासाठी खेळला नाही. तो स्वत:च एक विक्रम होता, हे स्पष्ट झाले. भारतीय संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर आणि के. श्रीकांत यांनी धोनीच्या निवृत्तीच्या ‘टायमिंग’बाबत नाराजी व्यक्त केली. वेंगसरकरांच्या मते, धोनी आणखी एक दौरा करू शकला असता. तर श्रीकांतच्या मते, त्याने निदान शेवटची कसोटी तरी पूर्ण करायची होती.
यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून त्याला बदली मिळणे कठीण आहे. त्यामुळे त्याला सिडनी कसोटीपर्यंत तरी थांबविले पाहिजे, असे श्रीकांत म्हणाला. काहीही असले तरी धोनीने स्वत:चे नियम स्वत:च बनवले होते. धोनीचे अनेकांशी वैयक्तिक संबंध होते. त्याच्याकडून अनेकदा मजेशीर उत्तरे मिळत. ‘मी काही प्रतिभावान नाही, त्यामुळे तेंडुलकरसारखा खेळत राहू शकणार नाही. मी यष्टिरक्षण करत असल्यामुळे कधीतरी मैदानावरच कोसळेन व तीच माझी शेवटची कसोटी असेल, असेही तो मिष्किलपणे सांगायचा. तेंडुलकरच्या निरोप समारंभप्रसंगी तो म्हणाला होता, की सचिनच्या निवृत्तीबाबत नेहमीच टीकाकार बोलतात तो मात्र त्याची पर्वा न करता खेळत असतो. मला कधी कधी वाटते की मी त्याच्यापूर्वीच निवृत्ती घेईन. त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील वावर तसाच जबरदस्त आहे.’ गेल्या काही विदेश दौऱ्यातील पराभवाने त्याला हा निर्णय घ्यावा लागला असेल; कारण कारकीर्द लांबवायची असेल तर एका प्रकाराला मला सोडचिठ्ठी द्यावी लागेल, असे संकेत धोनीने यापूर्वी दिले होते. दुसरीकडे, सुनील गावसकर यांनी धोनीचे कौतुक करताना म्हटले, की भारतीय क्रिकेट इतिहासात त्याचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल.
महेंद्रसिंग धोनी यापुढे कसोटी क्रिकेट खेळताना दिसणार नसला तरी आणखी एखादा धक्का देण्यापूर्वी मार्च २०१५ चा विश्वचषक त्याने जिंकून द्यावा, अशी सर्वच भारतीयांची अपेक्षा आहे.