क्रिकेटविश्व ‘विराट’मय

By admin | Published: March 29, 2016 02:40 AM2016-03-29T02:40:06+5:302016-03-29T02:40:06+5:30

संघातील सहकारी, विरोधी संघातील खेळाडू, माजी दिग्गज खेळाडू, क्रिकेटतज्ज्ञ, समीक्षक यांनी विराटच्या रंगारंग खेळीचं तोंडभरून कौतुक केले आहे.

Cricket World 'Virat' | क्रिकेटविश्व ‘विराट’मय

क्रिकेटविश्व ‘विराट’मय

Next

टष्ट्वेंटी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी मोहालीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध जी जिगरबाज खेळी केली, त्या खेळीवर अवघं क्रिकेटविश्व फिदा झालं आहे. संघातील सहकारी, विरोधी संघातील खेळाडू, माजी दिग्गज खेळाडू, क्रिकेटतज्ज्ञ, समीक्षक यांनी विराटच्या रंगारंग खेळीचं तोंडभरून कौतुक केले आहे. सोशल मीडियावर विराटच्या चर्चेचा महापूर आला होता. भारत आणि आॅस्ट्रेलियातील वृत्तपत्रांचे रकाने विराटस्तुतीने भरले होते. विविध वाहिन्यांवर कोहलीच्या नावाचा जयजयकार सुरू होता.

आक्रमकता हेच विराटचे शस्त्र : धोनी
मोहाली : रविवारी आॅस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विराट कोहलीच्या खेळीची भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने प्रशंसा केली. स्वाभाविक आक्रमकता हेच त्याचे शस्त्र आहे, आणि आव्हान स्वीकारण्याची वृत्ती विराटसाठी उपयुक्त ठरत असल्याचे धोनी म्हणाला.
कोहलीने रविवारी रात्री आॅस्ट्रेलियाविरुद्ध गट साखळी फेरीतील लढतीत ५१ चेंडूंना सामोरे जाताना नाबाद ८२ धावांची खेळी केली आणि भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना धोनी म्हणाला, ‘विराटची ही शानदार खेळी होती. खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल नसताना केलेली ही खेळी संस्मरणीय ठरली आहे. आॅस्ट्रेलियाने फिरकीपटूंना अधिक गोलंदाजी करण्याची संधी दिली नाही, ही बाब आमच्या पथ्यावर पडली. कोहलीने युवराजसोबत उपयुक्त भागीदारी केली. युवराजच्या टाचेला दुखापत झाल्यामुळे त्याला धावा काढताना पळण्यात अडचण भासत होती.’
कोहलीने धोनीसोबत ३१ चेंडूंमध्ये ६७ धावांची अभेद्य भागीदारी केली. यात जास्तीतजास्त धावा कोहलीने फटकावल्या. कोहली व धोनी यांची ‘रनिंग बिटविन द विकेट’ चांगली होती. वेगाने धावा काढणारा खेळाडू संघासाठी नेहमीच उपयुक्त ठरतो, असे धोनी म्हणाला.
धोनी पुढे म्हणाला, ‘तुमच्यामध्ये जर एकेरी-दुहेरी धावा काढण्याची क्षमता असेल तर मधल्या षटकांमध्ये तुमच्यावरील दडपण कमी होते आणि क्षेत्ररक्षक व गोलंदाजांवर दडपण येते. मी काही महान खेळाडू नाही. अपारंपरिक क्रिकेट खेळणारा साधा खेळाडू असून, एकेरी धावेचे दुहेरीमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रयत्नशील असतो. चेंडू जर माझ्या टप्प्यात असेल तर षटकार ठोकण्यासाठी प्रयत्नशील असतो. मी विराटप्रमाणे शैलीदार फलंदाज नाही. त्याच्यात कुठेही फटके खेळण्याची क्षमता आहे.’
भारतीय कर्णधार पुढे म्हणाला, ‘मधल्या फळीत अनेक फलंदाज चांगले रनर होते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मायकल बेव्हन आहे. तुमच्याकडे क्षेत्ररक्षकावर दडपण आणण्याची संधी असते. प्रत्येक संघात काही क्षेत्ररक्षक संथ असतात, तर काही क्षेत्ररक्षक वेगवान असतात; पण त्यांच्यात वेगाने थ्रो करण्याची क्षमता नसते. अशा वेळी त्यांना लक्ष्य करणे आवश्यक ठरते.’ (वृत्तसंस्था)

‘कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज’
नवी दिल्ली : विराट कोहलीच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघ विश्व टी-२० स्पर्धेत उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरल्यानंतर माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी कोहलीची प्रशंसा केली आहे. कोहली सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाज असल्याचे गावसकर यांनी म्हटले आहे.
गावसकर म्हणाले, ‘मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कोहली सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. तो विशेष आहे, यात काही दुमत नाही. माझ्या डोक्यावर जे थोडेफार केस शिल्लक आहेत, ते केसही या युवा खेळाडूची खेळी बघितल्यानंतर उभे झाले होते. ही शानदार खेळी होती. दडपणाखाली त्याची खेळी बहरते. त्यामुळे त्याची गणना महान फलंदाजांमध्ये होत आहे.’
गावसकर पुढे म्हणाले, ‘लक्ष्याचा पाठलाग करताना त्याची कामगिरी उल्लेखनीय आहे. तो प्रत्येकवेळी संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावण्यास सज्ज असतो. त्याच्या खेळीत ताकद व टायमिंग यांचा योग्य मेळ असतो. कोहली नि:स्वार्थी आहे. अनेकदा मोठी खेळी केल्यानंतर विजयी धाव आपण घ्यावी, असे फलंदाजाला वाटते; पण कोहली पूर्णपणे संघासाठी खेळणारा आहे. तो भारताचे प्रतिनिधित्व करीत आहे. यासाठी देवाचे आभार मानायला हवे.’


‘सलाम कोहली’
मोहाली : आयसीसी टी-२० विश्वकप स्पर्धेत साखळी फेरीत रविवारी भारताविरुद्ध आम्हाला विजयाची संधी होती. परंतु, कोहलीने चमकदार खेळी करीत आमचा विजय हिसकावला, त्याला सलाम, अशी प्रतिक्रिया आॅस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्हन स्मिथने व्यक्त केली.
पराभवानंतर प्रतिक्रिया देताना स्मिथ म्हणाला, ‘फलंदाजीसाठी प्रतिकूल असलेल्या खेळपट्टीवर ही शानदार खेळी होती. या लढतीत एकवेळ भारताला विजयासाठी प्रत्येक चेंडूवर दोन धावा फटकावण्याचे लक्ष्य होते. मात्र, विराट कोहलीने त्यानंतर दडपणाखाली शानदार खेळी केली. परंपरागत क्रिकेटचे फटके खेळूनही टी-२० मध्ये विजय मिळवता येतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोहलीने केलेली खेळी आहे.’

कोहलीची फटक्यांची निवड लारापेक्षा चांगली : चॅपेल
नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी विराट कोहली ‘सर्वकालिन फिनिशर’ असल्याचे म्हटले आहे. फटक्यांची निवड करण्याबाबतीत विराट वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू ब्रायन लाराच्या तुलनेत सरस आहे, असेही चॅपेल यांनी म्हटले आहे.
चॅपेल म्हणाले, ‘वर्तमान युगातील क्रिकेटपटूंमध्ये ब्रायन लारा फटक्यांची निवड योग्य पद्धतीने करीत होता. परंतु, आता माझ्या मते विराटला या क्रमवारीत अव्वल स्थान द्यावे लागेल.’
चॅपेल यांनी कोहलीच्या खेळीची प्रशंसा करताना म्हटले की, ‘आतापर्यंत मी बघितलेल्या सर्वोत्तम टी-२० खेळींपैकी ही एक खेळी होती. विराट सर्वकालिन फिनिशर आहे. आज त्याची पुन्हा एकदा प्रचिती आली.’
चॅपेल म्हणाले, ‘मी होबार्टमध्ये श्रीलंकेविरुद्ध ३०० पेक्षा अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराटला बघितले आहे. त्यावेळी भारताने ३२१ धावांचे लक्ष्य ३६.४ षटकांत पूर्ण केले होते. यापेक्षा कुणी चांगल्या पद्धतीने खेळू शकतो, असा विचारही मी केला नाही.’

आॅस्ट्रेलियन मीडिया भारावला
विराट कोहलीने आॅस्ट्रेलियाच्या टी-२० विश्वकप स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा संपुष्टात आणल्या असल्या तरी आॅस्ट्रेलियन मीडियाने मात्र या स्टार फलंदाजावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला आहे. विराटने एकट्याच्या बळावर भारताला अंतिम चार संघांत स्थान मिळवून दिले. ‘सिडनी मॉर्निंग हेराल्ड’चे ख्रिस बॅरेट यांनी आॅस्ट्रेलियन कर्णधार स्मिथने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेचा संदर्भ देताना म्हटले की, तो ‘विराट शो’ होता आणि ते योग्यही होते. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आतापर्यंतच्या सर्वांत महान खेळीपैकी एक खेळी करताना या दिग्गज भारतीय फलंदाजाने एकट्याच्या बळावर आॅस्ट्रेलियाला टी-२० विश्वकपमधून गाशा गुंडाळण्यास भाग पाडले.’
‘डेली टेलिग्राफ’च्या बेन होर्नेने कोहलीच्या खेळीबाबत म्हटले की, ‘एका व्यक्तीने विजय मिळवून दिला. सध्या विराट कोहलीसारखा प्रतिभावान क्रिकेटपटू विश्व क्रिकेटमध्ये दुसरा नाही, असे म्हणणे संयुक्तिक ठरेल.’
‘द आॅस्ट्रेलियन’चे गिडोन हेग यांनी म्हटले की, कोहलीने चमकदार फलंदाजी करीत लक्ष्याचा पाठलाग करण्याचा मार्ग सुकर केला. त्यांनी लिहिले आहे की, ‘कोहलीने लक्ष्याचा पाठलाग करणे एकदम सोपे केले. त्याच्या खेळीतील कुठलाही फटका कसोटी सामन्यात खेळला जात नाही, असे वाटलेच नाही.’
सिडनी मॉर्निंग हेराल्डने म्हटले की, ‘कोहली सचिनचा वारसदार म्हणून पुढे आला आहे. रविवारची रात्र पूर्णपणे कोहलीच्या नावावर होती.’

अनुष्काला ‘लक्ष्य’ करणे चुकीचे : विराट
नवी दिल्ली : सोशल मीडियावर बॉलिवूड स्टार अनुष्का शर्माला ‘लक्ष्य’ करणाऱ्यांवर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली उखडला. माझ्या क्रिकेट कारकिर्दीत काही नकारात्मक होण्याचे खापर अनुष्कावर फोडणाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे, अशा शब्दात विराटने आपली भावना व्यक्त केली.
टिष्ट्वटर व इन्स्टाग्रामवर भारताच्या प्रत्येक लढतीनंतर कोहलीची पूर्वीची मैत्रीण बॉलिवूड स्टार अनुष्का शर्माला लक्ष्य करणाऱ्यांवर कोहली उखडला.
कोहलीने पोस्ट केले की, ‘अनुष्काबाबत नकारात्मक टिपणी करणाऱ्यांना लाज वाटायला हवी. ते स्वत:ला शिकलेले समजतात. अनुष्काला दोषी ठरवणे आणि तिला टार्गेट करणाऱ्यांनी लाज बाळगायला हवी. मी कसा खेळतो याचे तिला काय देणे-घेणे. तिने नेहमीच मला प्रेरित करण्याचा प्रयत्न केला आहे. मी प्रदीर्घ कालावधीपासून याबाबत बोलण्याचा विचार करीत होतो.’ कोहलीने पुढे म्हटले की, ‘या पोस्टसाठी मला कुणाच्या सन्मानाची गरज नाही. जर तुमची बहीण, मैत्रीण किंवा पत्नी यांना जर सार्वजनिकरीत्या कुणी बरं-वाईट बोलले तर तुम्हाला कसे वाटेल.’ गेल्या वर्षी विश्वकप उपांत्य लढतीत कोहली अपयशी ठरल्यानंतर सोशल मीडियामध्ये अनुष्काला लक्ष्य करण्यात आले होते. (वृत्तसंस्था)

‘विराट’ प्रेमाची टिवटिव...

‘वाह... विराट कोहली... ही विशेष खेळी होती. शानदार विजय, तू शानदार रीतीने संघर्ष केलास, जबरदस्त विजय. भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया.’
- सचिन तेंडुलकर

‘कोणी विराट कोहलीच्या किशोरावस्थेतील व्हिडिओ मला पाठवू शकतो का? त्याचे टायमिंग अफलातून होते. तो अविश्वसनीय फलंदाज आहे.’
- ब्रायन लारा

‘काही खेळाडू असतात जे की फॉर्ममध्ये असतात आणि एक विराट आहे, जो संघासाठी सामने जिंकतो आहे. तुला सॅल्यूट!’
- युवराज सिंग

‘जियो कोहली, जियो मेरे शेर. काय जबरदस्त खेळी होती. माझा छोटा भाऊ विराट कोहली, तू चॅम्पियन खेळाडू आहेस.’
- हरभजन सिंग
‘विराट कोहलीचा सुरेख प्रयत्न. तू जबरदस्त जिद्द दाखवली. उपांत्य फेरीसाठी भारतीय संघाला शुभेच्छा!’
- अनुराग ठाकूर

‘विराट कोहलीला आज रात्री पाहणे किती सुखद होते. अतुल्य. त्याच्यासोबत एकाच संघात (आरसीबी) असण्यासाठी आणखी प्रतीक्षा करू शकत नाही.’
- शेन वॉटसन

‘ही खेळी वेगळ्या पातळीची होती. सांगण्यासाठी यापेक्षा जास्त काही असू शकत नाही. एका जिनिअस क्रिकेटरने हरवले. बेजोड.’
- मॅक्सवेल

‘विराट कोहलीची शानदार खेळी. मला तुझ्या (सचिन तेंडुलकर) अनेक खास खेळ्यांपैकी एकाची आठवण करून दिली.’
- शेन वॉर्न

‘खरे सांगायचे म्हटल्यास त्याने या टी-२0 विश्वकपमध्ये निश्चितच पुढे येऊन नेतृत्व केले आणि अखेरही शानदार सिद्ध झाली.’
- मिशेल जॉन्सन

‘शारजाहात सचिनचे वाळवंटातील तुफान आणि मोहालीत विराट कोहलीचे वादळ याचा उल्लेख एकाच पॅरामध्ये व्हायला हवा.’
- रविचंद्रन अश्विन

‘विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांनी पुन्हा एकदा काम कसे संपवायचे हे दाखवले. अभिनंदन!’
- आर. पी. सिंह

‘विराटची खेळी पाहिली. विशेष, मोठे व्यासपीठ आणि मोठ्या प्रसंगांचा आनंद घेतो, अशा खेळाडूला पाहून चांगले वाटते.’ - हर्षल गिब्ज

‘शानदार खेळीसाठी विराटला सलाम! त्याच्याकडून खूप काही शिकले जाऊ शकते.’
- शिखर धवन

‘जिनिअस विराट कोहली. किती सुरेख खेळी. भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया.’
- अनिल कुंबळे

‘भारताची शानदार कामगिरी आणि विराट कोहलीची शानदार खेळी.’ - सकलेन मुश्ताक

Web Title: Cricket World 'Virat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.