क्रिकेटपटू हुसैनची तुरुंगात रवानगी
By admin | Published: January 9, 2015 01:36 AM2015-01-09T01:36:57+5:302015-01-09T01:36:57+5:30
क्रिकेटपटू रुबेल हुसैनची बलात्कार आणि फसवणुकीच्या आरोपाखाली ढाक्यातील एका न्यायालयाने तुरुंगात रवानगी केली आहे़
ढाका : पुढील महिन्यात आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या वन-डे वर्ल्डकपसाठी बांगलादेश संघात समावेश असलेला क्रिकेटपटू रुबेल हुसैनची बलात्कार आणि फसवणुकीच्या आरोपाखाली ढाक्यातील एका न्यायालयाने तुरुंगात रवानगी केली आहे़
बांगलादेशमधील एका अभिनेत्रीने गत महिन्यात हुसैनविरुद्ध बलात्कार आणि लग्नाचे खोटे आश्वासन दिल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती़ यानंतर हुसैनने गुरुवारी न्यायालयासमोर शरणागती पत्करली होती़ त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्जही दाखल केला होता़ मात्र, न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला आणि त्याची तुरुंगात रवानगी केली़ आगामी वन-डे वर्ल्डकपसाठी बांगलादेशच्या १५ सदस्यीय राष्ट्रीय संघात समावेश असलेल्या रुबेलला १५ डिसेंबर रोजी न्यायालयाने चार आठवड्यांचा तात्पुरता जामीन मंजूर केला होता़ मात्र, जामिनाची मुदत संपल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते़
रुबेलला जेलची हवा खावी लागल्यामुळे आता २४ जानेवारी रोजी आॅस्ट्रेलियाला रवाना होणाऱ्या बांगलादेश संघासोबत तो जाईल किंवा नाही याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे़ त्याच्या जागी बांगलादेश क्रिकेट मंडळ (बीसीबी) अन्य खेळाडूची निवड करण्याची शक्यता आहे़ बीसीबीचे सीईओ निजामुद्दीन चौधरी यांनी सांगितले की, या प्रकरणावर मला सध्या कोणतीही प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही़ हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे़ मात्र, या प्रकरणात तथ्य आढळून आल्यास आम्हाला त्याचा पर्याय शोधावा लागेल़ (वृत्तसंस्था)