क्रिकेटर रवींद्र जाडेजाला 6 लाखांना लावला चुना !
By Admin | Published: August 17, 2016 02:51 PM2016-08-17T14:51:46+5:302016-08-17T14:51:46+5:30
भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाच्या लग्नात त्याला 6 लाखांना फसवल्याची घटना उघडकीस आली आहे
ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 17 - भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाच्या लग्नात त्याला 6 लाखांना फसवल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याआधी लग्नाच्या वरातीतल्या गोळीबारामुळे त्याचं लग्न विशेष चर्चेत आलं होतं. आता जाडेजाला एका कंपनीने 6 लाखांचा चुना लावण्याची घटना समोर आली आहे.
रवींद्र जाडेजाचं लग्न 17 एप्रिल झालं. या शाही विवाहसोहळ्यासाठी अहमदाबादच्या अॅब्सॉल्ट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीसोबत 11 लाखांचं कॉन्ट्रॅक्ट करण्यात आलं होतं. मात्र कंपनीचे मॅनेजर श्याम त्रिवेदी, केवल पटेल आणि उर्वी बावरिया यांनी जडेजा कुटुबीयांना अपेक्षित काम न केल्याने रवींद्र जाडेजाच्या बहिणीने पोलिसांत तक्रार केली आहे. त्याच्या बहिणीनं लग्नाच्या आयोजनाचं काम दुसऱ्या कंपनीला दिलं होतं. मात्र लग्न होऊन चार महिने उलटल्यानंतरही अहमदाबादच्या अॅब्सॉल्ट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडून 6 लाख रुपये त्यांना परत मिळाले नाहीत.
बहीण नयनाबा जाडेजाने सांगितलं की, रवींद्रचं लग्न 17 एप्रिलला झालं होतं. लग्नाच्या व्हिडीओग्राफीसह सर्व कार्यक्रमांसाठी अॅब्सॉल्ट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला 11 लाख रुपयांमध्ये कॉन्ट्रॅक्ट देण्याचं ठरलं होतं. यानिमित्तानं कंपनीला 6 लाख रुपये अॅडव्हान्सही देण्यात आले. मात्र कंपनीनं अपेक्षित काम न केल्यानं अॅब्सॉल्ट इव्हेंट मॅनेजमेंटकडून हे कॉन्ट्रॅक्ट काढून घेण्यात आलं होतं. लग्नाला चार महिने उलटल्यानंतरही कंपनीने पैसे परत करण्यास नकार दिला आहे. तसेच जे करायचंय ते करा, पण आम्ही पैसे परत देणार नाही, अशी धमकीही दिल्याची माहिती रवींद्र जडेजाच्या बहिणीनं दिली आहे.