रोनाल्डोनं सांगितला निवृत्तीचा प्लान; सौदी क्लबवरील प्रेम अन् राष्ट्रीय संघाला सरप्राइज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 04:06 PM2024-08-27T16:06:20+5:302024-08-27T16:11:44+5:30
ख्रिस्टियानो रोनाल्डो याने सध्याच्या क्लबसह राष्ट्रीय संघातून निवृत्तीसंदर्भात मनातील गोष्ट बोलून दाखवलीये.
फुटबॉलच्या जगतात अधिराज्य गाजवताना करिअर अधिक लांबवणं ही काही सोपी गोष्ट नाही. पण ख्रिस्टियानो रोनाल्डोनं ते करून दाखवलय. कमालीच्या फिटनेसच्या जोरावर वयाच्या ३९ वर्षीही तो मैदान गाजवतोय. पण आता त्याने आपल्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत. मदीराच्या रस्त्यावरून सुरु झालेला त्याचा प्रवास सउदी अरबमध्ये संपणार असल्याची त्याने पुष्टी केलीये.
रोनाल्डोला या संघाची साथ नाही सोडायची
पोर्तुगालच्याख्रिस्तियानो रोनाल्डोने वेगवेगळ्या क्लबकडून खेळल्यानंतर २०२३ पासून तो सौदीच्या अल नासरसोबत करारबद्ध झाला. या क्लबकडून त्याने ६७ सामन्यात ६१ गोल केले आहेत. याशिवाय १६ गोलसाठी मदतही त्याने केली आहे. याच क्लबकडून निवृत्त व्हायला आवडेल, असे रोनाल्डोनं म्हटलं आहे. पोर्तुगालमधील नाउ टेलिव्हिजन चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्टार फुटबॉलरनं निवृत्तीचा प्लान स्पष्ट केला.
निवृत्तीसंदर्भात काय म्हणाला रोनाल्डो?
निवृत्तीसंदर्भातील प्रश्नावर तो म्हणाला आहे की, "लवकरच निवृत्त होणार की, दोन तीन वर्षांनी हे माहित नाही. पण ज्यावेळी ही वेळ येईल त्यावेळी कदाचित मी अल नासर क्लबसोबतच असेन. या क्लबकडून खेळणं आनंददायी आहे. हा देशही मला खूप आवडतो. या क्लबकडून खेळण्याचा सध्या आनंद घेत असून ते कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे रोनाल्डनं सांगितले.
या क्लबनंकडून झाला सुपरस्टार
३९ वर्षीय पोर्तुगाल स्टारचा सर्वात यशस्वी काळ हा रिअल माद्रिदकडून खेळतानाचा राहिला. याच क्लबकडून खेळताना तो सर्वकालीन महान फुटबॉलरच्या यादीत सामील झाला. या क्लबकडून त्याने ४३८ सामन्यात ४५० गोल डागले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरही सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो आघाडीवर आहे.
राष्ट्रीय संघालाही सरप्राइज देणार रोनाल्डो
क्लब फुटबॉलशिवाय सध्याच्या घडीला राष्ट्रीय संघातही बहुमुल्य योगदान देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे तो म्हणाला. राष्ट्रीय संघातून निवृत्तीचा निर्णय अगदी सहज घेईन. त्याची कल्पना फार आधी कुणाला देणार नाही, असे म्हणत त्याने अचानक निवृत्तीचा बॉम्ब टाकणार, हेच स्पष्ट केलं आहे. सध्या आगामी नेशन्स लीगमध्ये राष्ट्रीय संघात योगदान देण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगत सध्यातरी संघाकडून खेळण्याला पहिली पसंती आहे, हे त्याने बोलून दाखवले आहे.