अब तक १,०००,०००,०००! एवढे 'फॉलोअर्स' कमावणारा रोनाल्डो जगातील पहिला अन् एकमेव माणूस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 02:01 PM2024-09-13T14:01:30+5:302024-09-13T14:01:30+5:30
फिटनेसच्या जोरावर फुटबॉलच्या मैदानातील दमदार कामगिरीनं 'एक से बढकर एक' विक्रम नोंदवणाऱ्या या पठ्यानं आता चाहत्यांच्या जोरावर अशक्यप्राय 'गोल'चा टप्पा साध्य केला आहे.
जगभरातील चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेल्या स्टार फुटबॉलर ख्रिस्टियानो रोनाल्डो यानं नव्या महा विक्रमाला गवसणी घातली आहे. कमालीच्या फिटनेसच्या जोरावर फुटबॉलच्या मैदानातील दमदार कामगिरीनं 'एक से बढकर एक' विक्रम नोंदवणाऱ्या या पठ्यानं आता चाहत्यांच्या जोरावर अशक्यप्राय 'गोल'चा टप्पा साध्य केला आहे.
अब्जाधीश फॉलोअर्स असणारा पहिला खेळाडू ठरला रोनाल्डो
सोशल मीडियावर त्याने एक बिलियन म्हणजेच एक अब्ज फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे. रोनाल्डो हा एक अब्ज फॉलोअर्स असणारा जगातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. याआधी अल नासर क्लबच्या स्ट्रायकरनं काही दिवसांपूर्वीच आपल्या कारकिर्दीतील ९०० गोलचा टप्पा गाठला होता. या ऐतिहासिक कामगिरीनंतर नेहमी पाठीशी असणाऱ्या चाहत्यांचे रोनाल्डोनं आभारही मानलल्याचे पाहायला मिळाले होते. हेच कारण आहे ज्यामुळे दिवसागणिक त्याच्या चाहत्यांचा आकडा अगदी वेगाने वाढतानाचे चित्र पाहायला मिळते.
याआधी कुणालाच मिळालेली नाही एवढी लोकप्रियता
इन्स्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रोनाल्डोच्या फॉलोअर्सचा आकडा हा एक अब्जहून अधिक झाला आहे. जगभरातून इतक्या मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग कमावणारा तो फक्त पहिला खेळाडूच नाही तर जगातील तो पहिला व्यक्ती आहे ज्याने सोशल मीडियावर एवढ्या मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग कमावला आहे.
रोनाल्डोनं खास शब्दांत व्यक्त केल्या मनातील भावना
We’ve made history — 1 BILLION followers! This is more than just a number - it’s a testament to our shared passion, drive, and love for the game and beyond.
— Cristiano Ronaldo (@Cristiano) September 12, 2024
From the streets of Madeira to the biggest stages in the world, I’ve always played for my family and for you, and now 1… pic.twitter.com/kZKo803rJo
रोनाल्डोनं एक्स (पूर्वीचे ट्विटर) च्या माध्यमातून १ बिलियन फॉलोअर्सचा आकडा पार केल्याची माहिती शेअर केली आहे. १ बिलियन फॉलोअर्ससह आपण इतिहास रचला आहे. हा फक्त एक आकडा नाही तर खेळाप्रतीची प्रेरणा आणि प्रेम याचा हा पुरावा आहे. मदीराच्या गल्लीपासून ते जगातील सर्वात मोठ्या व्यासपीठापर्यंत तुम्ही माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला. माझ्या आयुष्याचा हिस्सा झालेल्या प्रत्येकाचा मी ऋणी आहे, अशा शब्दांत रोनाल्डोनं चढ उताराच्या काळात नेहमी सोबत असणाऱ्या चाहत्यांचे मनापासून आभार मानले आहेत.