ख्रिस्तियानो रोनाल्डो, रानियेरी मानकरी
By admin | Published: January 11, 2017 01:29 AM2017-01-11T01:29:49+5:302017-01-11T01:29:49+5:30
रियल माद्रिद व पोर्तुगालचा स्टार ख्रिस्टियानो रोनाल्डोने देशातर्फे आणि क्लबतर्फे खेळताना २०१६ मध्ये सर्वोत्तम कामगिरी करीत फिफाचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला
झ्युरिच : रियल माद्रिद व पोर्तुगालचा स्टार ख्रिस्टियानो रोनाल्डोने देशातर्फे आणि क्लबतर्फे खेळताना २०१६ मध्ये सर्वोत्तम कामगिरी करीत फिफाचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला.
लिसेस्टर सिटीच्या क्लाडियो रानियेरीची वर्षातील सर्वोत्तम प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली. प्रीमियर लीगमध्ये त्यांच्या संघाने चमकदार कामगिरी करीत जेतेपदाला गवसणी घातली.
३१ वर्षीय रोनाल्डोने परंपरागत प्रतिस्पर्धी लियोनल मेस्सी व युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये आघाडीचा खेळाडू ठरलेला फ्रान्सचा ग्रिजमॅन यांना पिछाडीवर सोडत वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. रोनाल्डोने कारकिर्दीत चॅम्पियन्स लीगचे तिसरे जेतेपद आणि पोर्तुगालसह युरो २०१६ मध्ये जेतेपद पटकावल्यानंतर ‘बेलोन डिओर’ पुरस्काराचा मान मिळवला. त्याने चॅम्पियन्स लीगमध्ये १२ सामन्यांत १६ गोल नोंदवले. फिफाचे अध्यक्ष जियानी इनफन्टिनो यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारल्यानंतर रोनाल्डो म्हणाला, ‘२०१६ हे माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम वर्ष ठरले.’
दुसऱ्या बाजूचा विचार करता ६५ वर्षीय रानियेरी यांनी रियोचे व्यवस्थापक जिनेदिन जिदान व पोर्तुगालचे व्यवस्थापक फर्नांडो सांतोस यांना पिछाडीवर सोडत सर्वोत्तम प्रशिक्षकाचा पुरस्कार पटकावला त्यांना अर्जेंटिनाचे महान खेळाडू डिएगो मॅराडोना यांनी ही ट्रॉफी प्रदान केली.
गेल्या वर्षी रेलिगेशनची नामुष्की टाळण्यात यशस्वी ठरल्यानंतर यंदा सर्वांना चकित करीत त्यांनी हा पुरस्कार पटकावला.
खेळाडूंची निवड राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक व कर्णधार यांच्या व्यतिरिक्त निवडक पत्रकारांचा गट व चाहत्यांच्या मतांच्या आधारावर करण्यात आली.
रोनाल्डोला ३१.५ टक्के तर मेस्सीला २६.४ टक्के मते मिळाली. मेस्सी या पुरस्कार वितरण समारंभात सहभागी झाला नव्हता. कार्यक्रमाचे संचालन अमेरिकेची अभिनेत्री इवा लोंगोरियाने केले. अमेरिकेची मिडफिल्डर कार्ली लॉयडची २०१६ ची सर्वोत्तम महिला खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. वर्षातील सर्वश्रेष्ठ फिफप्रो संघातील ११ पैकी ९ खेळाडू स्पेनच्या ला लीग्मधील आहेत. त्यांचे नेतृत्व रोनाल्डो व मेस्सी यांनी केले. बायर्न मुनिचचा गोलकीपर मॅन्युअल न्यूर याने सलग चौथ्या वर्षी संघात स्थान पटकावले.
फिफाने कोलंबियाचा संघ एटलेटिको नेसियोनलची ‘फेयर प्ले’ पुरस्कारासाठी निवड केली. या संघाने अमेरिकी फुटबॉलचे संचालन करणाऱ्या संस्थेला विभागीय क्लब स्पर्धेचे जेतेपद चॅपेकोएंस संघाला बहाल करण्याची विनंती केली होती. ब्राझीलच्या चॅपेकोएंस संघातील अनेक खेळाडूंचा फायनलच्या पहिल्या टप्प्यातील लढतीसाठी प्रवासादरम्यान विमान अपघातात मृत्यू झाला होता. (वृत्तसंस्था)