‘चेल्सी’ची गुणतक्त्यात निर्णायक आघाडी
By admin | Published: December 29, 2014 04:26 AM2014-12-29T04:26:41+5:302014-12-29T04:26:41+5:30
इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये शनिवारी (दि. २७) ‘चेल्सी’ने वेस्ट हॅम युनायटेडवर २-० अशी मात केली.
मॅँचेस्टर : इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये शनिवारी (दि. २७) ‘चेल्सी’ने वेस्ट हॅम युनायटेडवर २-० अशी मात केली. या विजयामुळे ‘चेल्सी’चे ४५ गुण झाले असून चेल्सीने गुणतक्त्यात निर्णायक आघाडी घेतली आहे. दुसऱ्या स्थानी मँचेस्टर सिटी असून त्यांचे ४२ गुण आहेत.
सामन्याच्या प्रारंभापासूनच ‘वेस्ट हॅम युनायटेड’ने आक्रमक खेळ करण्यास प्रारंभ केला. सामन्याच्या दहाव्या मिनिटाला वेस्ट हॅमच्या अॅँडी कॅरॉलने मारलेला चेंडू गोल पोस्टला घासून गेला. यानंतर मात्र चेल्सीने आपला खेळ उंचावण्यास प्रारंभ केला. त्यांनी चेंडू जास्तीत जास्त वेळ आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला. ‘चेल्सी’च्या आॅस्कर, गॅरी चाहील आणि विल्यम यांनी ‘वेस्ट हॅम’च्या गोलपोस्टवर वारंवार आक्रमण केले.
अखेर सामन्याच्या ३१ व्या मिनिटाला चेल्सीला गोल करण्यात यश मिळाले. दिएगो कोस्टाने दिलेल्या पासवर आॅस्करने गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर चेल्सीने आपला खेळ आणखी उंचावला. सामन्याच्या ६० व्या मिनिटाला एडन हजार्डने दिलेल्या पासवर दिऐगा कोस्टाने गोल करत २-० अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात वेस्ट हॅम युनायटेडने गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र, ‘चेल्सी’च्या बचाव फळीपुढे त्यांचे काही चालले नाही. निर्धारित वेळत चेल्सीने सामना २-० असा जिंकला. (वृत्तसंस्था)