‘ब’ नमुना चाचणीत आढळला दोषी
By admin | Published: July 25, 2016 01:48 AM2016-07-25T01:48:42+5:302016-07-25T01:48:42+5:30
रिओ आॅलिम्पिकला बोटावर मोजण्याएवढे दिवस शिल्लक असताना कुस्तीपटू नरसिंग यादव बंदी असलेल्या स्टेराईडसाठी पॉझिटिव्ह आढळला आहे.
नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकला बोटावर मोजण्याएवढे दिवस शिल्लक असताना कुस्तीपटू नरसिंग यादव बंदी असलेल्या स्टेराईडसाठी पॉझिटिव्ह आढळला आहे. त्याचा ‘ब’ नमुनासुद्धा पॉझिटिव्ह आढळला आहे. ज्या वेळी त्याच्या ‘ब’ नमुन्याची चाचणी घेण्यात आली त्या वेळी तो स्वत: उपस्थित होता. असे राष्ट्रीय डोपिंगविरोधी एजन्सीचे (नाडा) महासंचालक नवीन अगरवाल यांनी सांगितले.
अगरवाल पुढे म्हणाले, नरसिंग शनिवारी शिस्तपालन समितीपुढे हजर झाला होता. समितीने या प्रकरणी आणखी अहवाल मागितला आहे. समिती लवकरच कारवाई करेल, अशी मला आशा आहे. तोपर्यंत आम्हाला प्रतीक्षा करावी लागणार आहे.
नरसिंग रिओ आॅलिम्पिकमध्ये खेळू शकणार नाही का, याबाबत बोलताना अग्रवाल म्हणाले, की सध्याच याबाबत भाष्य करणे घाईचे ठरेल. आम्ही लवकरच प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. मी सध्याच याबाबत काही भाष्य करू शकत नाही.
७४ किलो वजन गटातील प्रतिनिधित्वाचा निर्णय नंतर घेण्यात येईल, पण सध्या रिओमध्ये ७४ किलो वजन्ीा गटात भारताचे प्रतिनिधित्व राहणार नाही. नरसिंगवर अस्थायी स्वरूपाच्या निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे.
गेल्या वर्षी विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकाचा मानकरी ठरलेल्या नरसिंगची रिओ आॅलिम्पिकसाठी निवड वादग्रस्त परिस्थितीत झाली. कारण, आॅलिम्पिकमध्ये दोनदा पदकाचा मानकरी ठरलेल्या सुशील कुमारने ७४ किलो वजन गटात दावेदारी सादर करताना निवड चाचणी घेण्याची मागणी केली होती. नरसिंगने विश्व चॅम्पियनशिपच्या आधारावर कोटा स्थान निश्चित केलेले असल्यामुळे डब्ल्यूएफआय आणि दिल्ली उच्च न्यायालयाने सुशीलची मागणी फेटाळली होती. या प्रकरणात अद्याप कुठल्याच प्रकाराचे अधिकृत वक्तव्य करण्याचे टाळणाऱ्या सुशीलने वाद समोर आल्यानंतर टिष्ट्वट केले, की आदर मागितल्या जात नाही, तो मिळवावा लागतो. विश्व चॅम्पियनशिपमधील माजी पदक विजेत्या सुशील कुमारने मात्र त्याने हे टिष्ट्वट कुठल्यासंदर्भात केले आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
नरसिंगला आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व निश्चित करण्यासाठी सुशीलसोबत प्रदीर्घ काळ न्यायालयात लढा द्यावा लागला. क्रीडा मंत्रालयाने एक मल्ल डोप चाचणीत अपयशी ठरल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असला, तरी त्यात यादवचे नाव नमूद करण्यात आलेले नाही. एडीडीपीचे अध्यक्ष कायदेतज्ज्ञ असून, त्यात डॉक्टर व खेळाडूंचा समावेश आहे. नाडा युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्य करणारी स्वायत्त संस्था आहे. ही संस्था डोपिंगची चाचणी करते. नाडाने म्हटले आहे, की भारत डोपिंगविरोधी आचारसंहितेचे पालन करण्यासाठी कटिबद्ध आहे. सरकार नाडाच्या दैनंदिन कार्यामध्ये ढवळाढवळ करीत नाही. (वृत्तसंस्था)