चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेतेपदाबाबत उत्सुकता
By admin | Published: June 18, 2017 03:12 AM2017-06-18T03:12:36+5:302017-06-18T03:12:36+5:30
साखळी फेरीत सलामी लढतीत भारतीय संघाने ज्या पाक संघाचा धुव्वा उडवला त्याच संघाविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत गाठ पडेल, याचा कुणी विचारही केला नसेल.
- सुनील गावसकर लिहितात...
साखळी फेरीत सलामी लढतीत भारतीय संघाने ज्या पाक संघाचा धुव्वा उडवला त्याच संघाविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत गाठ पडेल, याचा कुणी विचारही केला नसेल.
याचे मुख्य कारण आहे पाकचा कर्णधार सरफराज अहमदचे शानदार नेतृत्व आणि भारताचा अपवाद वगळता अन्य संघांविरुद्ध चमकदार कामगिरी.
भारताविरुद्ध खेळताना पाकिस्तानचे खेळाडू अधिक भयभीत असतात, पण अंतिम लढतीत निश्चितच सरफराजच्या नेतृत्वाखाली एक वेगळाच पाक संघ बघायला मिळू शकतो. सलामीला पाक संघात फखर जमानसारखा फलंदाज आहे. तो पहिल्या १० षटकांत प्रतिस्पर्धी संघाला अडचणीत आणू शकतो. प्रतिस्पर्धी गोलंदाजांविरुद्ध खेळताना फखर निर्भीड असतो. दुसऱ्या टोकावर त्याला अझहर अलीची मिळणारी साथ सलामीच्या गोलंदाजांसाठी अडचणीचे कारण ठरू शकते. या दोघांचा अपवाद वगळता पाकिस्तानच्या अन्य फलंदाजांना विशेष छाप सोडता आलेली नाही. दरम्यान, बाबर आजमने टप्प्याटप्प्यात झलक दाखविली आहे. त्यानंतर अनुभवी शोएब मलिक व सरफराज यांचा क्रमांक येतो. पाकच्या फलंदाजीमध्ये हे खेळाडू महत्त्वाची भूमिका बजावतात. यांच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर पाकने श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत सरशी साधत उपांत्य फेरी गाठली होती. सरफराजने आपल्या नेतृत्वाने प्रभावित केले आहे. गोलंदाजीमध्ये योग्य बदल आणि मधल्या षटकांमध्ये फिरकीपटूंचा योग्य वापर पाक संघाच्या यशात निर्णायक ठरला आहे. मोहम्मद आमिर अंतिम लढतीत खेळण्याची शक्यता आहे. आमिर जुनेद खान व हसन अलीच्या साथीने नव्या चेंडूने गोलंदाजीचा भार सांभाळेल.
भारतीय सलामीवीर शानदार फॉर्मात आहेत. रोहितने शतकी खेळी करीत आपले महत्त्व पटवून दिले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसोबत धवनचे विशेष प्रेम असल्याचे दिसून येते. उपांत्य फेरीत कोहलीच्या शानदार खेळीनंतर उर्वरित फलंदाजांना विशेष काही करण्याची फारच कमी संधी मिळाली. क्षेत्ररक्षणामध्ये आक्रमकता येणे आवश्यक आहे. कोहलीने चपळ क्षेत्ररक्षकांना सीमारेषेवर तैनात करायला हवे. त्यामुळे चौकारांवर नियंत्रण राखता येईल. भारतीय संघात बदल करण्याची शक्यता दिसत नाही. जर रविवारी सकाळी ढगाळ वातावरण असेल तर अतिरिक्त वेगवान गोलंदाजाला संधी देण्याबाबत विचार करता येईल. भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. पण काही खेळाडू मोक्याच्या क्षणी चांगली कामगिरी करतात, काही अपयशी ठरतात. त्यामुळे चमकदार कामगिरी करीत कुठला संघ जेतेपद पटकावतो, याबाबत उत्सुकता आहे. (पीएमजी)