मेडिसन स्क्वेअरवर पदार्पणासाठी उत्सुक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 04:28 AM2018-12-07T04:28:32+5:302018-12-07T04:28:39+5:30
भारताचा दिग्गज व्यावसायिक मुष्टीयोध्दा विजेंदर सिंगला मेडिसन स्क्वेअर गार्डनवर अमेरिकन व्यावसायिक सर्किटमध्ये पदार्पण करण्याची इच्छा आहे.
नवी दिल्ली: भारताचा दिग्गज व्यावसायिक मुष्टीयोध्दा विजेंदर सिंगला मेडिसन स्क्वेअर गार्डनवर अमेरिकन व्यावसायिक सर्किटमध्ये पदार्पण करण्याची इच्छा आहे. त्याचबरोबर मेक्सिकोचा सुपरस्टार केनेलो अल्वारेज याच्याविरुद्ध लढण्याचीही त्याने इच्छा व्यक्त केली आहे. विजेंदर अमेरिकन व्यावसायिक स्पर्धेसाठी प्रशिक्षक फ्रेडी रोच यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करणार आहे. रोच हे दिग्गज मुष्टीयोद्धा मॅनी पॅकियाओ याचे प्रशिक्षक आहेत.
आॅलिम्पिक व जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक विजेता विजेंदर २०१५ मध्ये व्यावसायिक खेळाडू बनला आहे. त्याने व्यावसायिक स्पर्धेत आतापर्यंत एकही लढत गमावलेली नाही. मात्र या वर्षी विजेंदरने एकाही लढतीत सहभाग घेतलेला नाही. ब्रिटन व भारतात झालेल्या १० लढतीनंतर विजेंदर अमेरिकेत लढत देणार आहे.
विजेंदर म्हणाला, ‘मेडिसन स्क्वेअरमध्ये लढण्याचे माझे स्वप्न आहे. मी बॉब आरुमशी करार केलेला आहे. त्यांना मी मेक्सिकोचा सुपरस्टार केनेलो अल्वारेज याच्याशी लढण्याचीही इच्छा असल्याचे सांगितले आहे. पुढील वर्षी कदाचित मी त्याच्याशी लढू शकेल असे त्यांनी मला सांगितले.’ विजेंदर पुढे म्हणाला, ‘केनेलोविरुद्धची लढत माझ्ये लक्ष्य आहे. मला जागतिक विजेतेपद पटकावयचे आहे.’ (वृत्तसंस्था)
>28वर्षीय केनेलो याने अनेकवेळा जागतिक विजेतेपद पटकावले आहे. तो म्हणाला, ‘या वर्षी मी बहुतांश वेळ सराव व अमेरिकेतील करारावर दिला. त्याचबरोबर मी माझ्या पाचवर्षाच्या मुलासाठी वेळ दिला होता.’
विजेंदर आता अमेरिकेत पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. यासाठी तो पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात पदार्पण करण्याचा विचार करत आहे.
व्यावसायिक स्पर्धेत छाप पाडलेले प्रशिक्षक रोच यांनी ५३ लढतीपैकी ४० लढती जिंकल्या. मात्र पार्किसन आजारामुळे त्यांनी २६व्या वर्षी निवृत्ती घेतली होती.