उत्सुकता महिला विजेतीची
By Admin | Published: July 7, 2017 01:23 AM2017-07-07T01:23:40+5:302017-07-07T01:23:40+5:30
यंदाची विम्बल्डन टेनिस स्पर्धा ३ जुलैपासून चालू झाली आहे. विम्बल्डन म्हणजे वर्षातल्या चार ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी एक मानाची स्पर्धा. जसे
- केदार ओक
यंदाची विम्बल्डन टेनिस स्पर्धा ३ जुलैपासून चालू झाली आहे. विम्बल्डन म्हणजे वर्षातल्या चार ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी एक मानाची स्पर्धा. जसे मानाचे गणपती असतात तसंच टेनिसमधलं हे विम्बल्डन. इतर ग्रँडस्लॅम स्पर्धांची भव्यता एकवेळ नसेल, पण विम्बल्डनची परंपरा भुरळ पडण्यासारखीच आहे. मस्त हिरवं कोर्ट, पांढरेशुभ्र कपडे, आजकालच्या बेसलाईनवरून खेळल्या जाणाऱ्या ताकदवान खेळाला थोड्या प्रमाणात छेद देणारा पारंपरिक असा डोळ्यांना सुंदर दिसणारा खेळ, सुसह्य उन, अधूनमधून डोकावणारा पाऊस आणि स्ट्रॉबेरी-क्रीमचा आस्वाद घेत सुट्टीचा आनंद घेत टेनिस बघणारे शिस्तबद्ध इंग्लिश प्रेक्षक.
पुढील काही दिवस आपण या लेखमालेद्वारे यंदाच्या विम्बल्डनची सफर करून येणार आहोत. इंग्लिशमध्ये असं म्हणतात की ‘लेडीज फर्स्ट’, म्हणजे महिलांना प्राधान्य. त्यालाच अनुसरून आजच्या पहिल्या लेखात आपण महिलांच्या स्पर्धेवर एक नजर टाकूया.
तब्बल २३ ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकलेली, ७ वेळची विम्बल्डन विजेती अमेरिकेची सेरेना विल्यम्स लवकरच एका बाळाची आई होणार असल्याने यंदा विम्बल्डन स्पर्धेत खेळणार नाहीये. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या गरोदरपणातच तिने वर्षाच्या सुरुवातीला झालेली आॅस्ट्रेलियन ओपन जिंकली होती. सेरेनाच्या अनुपस्थितीमुळे आता बऱ्याच जणींना त्या थाळीवर आपलं नाव कोरण्याची संधी आहे. माजी विजेत्या मारिया शारपोवाने उत्तेजक चाचणीत नापास झाल्यामुळे घातलेल्या बंदीनंतर नुकतंच पुनरागमन केलं होतं पण दुखापतीमुळे ती पुन्हा एकदा खेळापासून दूर गेली आहे.
अँजेलीक कर्बर : जर्मनीची ही डावखुरी खेळाडू सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी तीन ग्रॅण्डस्लॅम्सच्या अंतिम फेरीत पोहोचून दोन विजेतेपदं कर्बरने पटकावली असली तरी गेले काही महिने तिचा खेळ खालावला आहे. तिची हरवलेली लय पाहता यंदाचं विम्बल्डन तिच्यासाठी खडतर जाण्याची शक्यताच अधिक आहे.
सिमोना हेलप : क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेली ही गोड चेहऱ्याची आणि तितकाच आक्रमक खेळ असणारी रुमानिया देशाची खेळाडू. सिमोनाने गेल्याच महिन्यात झालेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवण्यात दुसऱ्यांदा अपयश आलं असलं तरी गेल्या चार वर्षातली तिची सातत्यपूर्ण कामगिरी थक्क करणारी आहे.
कॅरोलिना प्लिस्कोवा : चेक प्रजासत्ताकची ही गुणी खेळाडू गेल्या वर्षीपर्यंत काळोखात चाचपडत होती. पण हळूहळू तिला तिचा खेळ गवसला आणि यूएस ओपनला चक्क सेरेनाला हरवून तिने अंतिम फेरी गाठली. मग या वर्षी आॅस्ट्रेलियन ओपनची उपांत्यपूर्व फेरी आणि फ्रेंच ओपनची उपांत्य फेरी गाठत कामगिरीतलं सातत्यही तिने दाखवून दिलं आहे. इतर छोट्या स्पर्धांमध्येही ती जिंकत आहेच. विम्बल्डनच्या हिरवळीवर फायदेशीर ठरेल अशी उत्तम सर्व्हिस हा तिचा हुकमी एक्का. त्यामुळे मोठी मजल मारण्याची क्षमता हिच्यात नक्कीच आहे.
एलिना स्विटोलिना : युक्रेनची ही २२ वर्षांची खेळाडू यंदा भलतीच फॉर्ममध्ये आहे. या वर्षी चार स्पर्धेत विजेतेपद मिळवून तिचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. एलिनाला फक्त गेल्या महिन्यात झालेल्या फ्रेंच ओपनमधला सिमोना हेलपविरुद्धचा पराजय विसरावा लागेल. जिंकण्यापासून केवळ हाकेच्या अंतरावर असताना स्विटोलिनाला हेलपने रोखलं होतं. यंदा जिंकेल की नाही ते सांगता येणार नाही पण स्विटोलिनाचं भविष्य मात्र नक्कीच उज्ज्वल असेल अशी आशा वाटते.
कॅरोलिन वॉझनिएकी : डेन्मार्कची कॅरोलिन तरुण असली तरी बरीच वर्षं मुख्य स्पर्धांमध्ये खेळत आहे. हेलपप्रमाणे हिलासुद्धा सातत्याने चांगलं खेळूनही तो शेवटचा क्षण हुलकावणी देतोय. गेल्या वर्षी दुखापतीमुळे घेतलेल्या मोठ्या विश्रांतीनंतर मात्र जोरदार खेळ करत तिचं क्रमवारीतलं स्थान आता खूप उंचावलं आहे.
या ५ जणी जरी जिंकण्याच्या मुख्य दावेदार असल्या तरी सेरेनाइतकं सातत्य कुणाही महिला खेळाडूमध्ये नाही. त्यामुळे अचानक कुणीतरी नवखी खेळाडू आपल्या सगळ्यांना चकित करू शकते, जसं गेल्या महिन्यातल्या फ्रेंच ओपनमध्ये झालं. फारश्या प्रसिद्ध नसलेल्या लाटवीया देशाच्या येलेना ओस्टापेंकोने हेलपला मात देऊन फ्रेंच ओपन जिंकलं. गेल्या वर्षीची फे्रेंच विजेती मुगुरुजा, अनुभवी विजेती व्हिनस , पुनरागमन करीत असलेली अझारेंका आणि यजमान देशाची योहाना कोंटा यांच्या कामगिरीकडेही प्रेक्षकांचे लक्ष्य असेल.