‘शापित गंधर्व’

By admin | Published: March 23, 2015 01:39 AM2015-03-23T01:39:33+5:302015-03-23T01:39:33+5:30

विश्वकप क्रिकेट स्पर्धेत सुरुवातीपासून आतापर्यंत उपांत्य फेरीचा मार्ग सहज गाठणाऱ्या न्यूझीलंड संघापुढे यावेळीही हा अडथळा पार करण्याचे आव्हान आहे.

'Cursed Gandharva' | ‘शापित गंधर्व’

‘शापित गंधर्व’

Next

आॅकलंड : विश्वकप क्रिकेट स्पर्धेत सुरुवातीपासून आतापर्यंत उपांत्य फेरीचा मार्ग सहज गाठणाऱ्या न्यूझीलंड संघापुढे यावेळीही हा अडथळा पार करण्याचे आव्हान आहे. न्यूझीलंडपुढे उपांत्य फेरीत आजतागायत उपांत्य फेरीपुढे मजल मारण्यात अपयशी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आहे. प्रतिभा असताना यापूर्वी अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरलेल्या न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिका या संघांदरम्यान रंगणाऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीनंतर यावेळी एक संघ मात्र अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम करणार आहे, हे मात्र निश्चित. ‘शापित गंधर्व’ संघांदरम्यानच्या मंगळवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत कुठला संघ बाजी मारणार याबाबत उत्सुकता आहे.
न्यूझीलंडने विक्रमी सातव्यांदा उपांत्य फेरीत धडक मारली आहे. यापूर्वी सहा स्पर्धांमध्ये त्यांना उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला आहे. पण यावेळी साखळी फेरीत अपराजित राहून त्यांनी अंतिम चारमध्ये प्रवेश मिळविला आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता दक्षिण आफ्रिका संघ ‘चोकर्स’चा शिक्का पुसून काढण्यास प्रयत्नशील आहे. दक्षिण आफ्रिका संघाने चौथ्यांदा उपांत्य फेरीत धडक मारली आहे. यापूर्वी तीनवेळा त्यांना अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. यावेळी उभय संघांपैकी एक संघ निश्चितच उपांत्य फेरीचा अडथळा पार करण्यात यशस्वी ठरणार आहे.
उपांत्य फेरीत पराभूत होण्याचे दु:ख दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत न्यूझीलंड संघाला अधिक आहे. न्यूझीलंडने १९७५च्या पहिल्या विश्वकप स्पर्धेत अंतिम चारमध्ये स्थान मिळविले होते. पण त्यावेळी त्यांना उपांत्य फेरीतच चॅम्पियन वेस्ट इंडिज संघाविरुद्ध पाच विकेटस्ने पराभव स्वीकारावा लागला होता.
त्यानंतर चार वर्षांनी १९७९ मध्ये पुन्हा एकदा न्यूझीलंडने उपांत्य फेरी गाठली, पण त्यावेळी त्यांना यजमान इंग्लंडविरुद्ध ९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
न्यूझीलंडला १९८३ व १९८७ मध्ये उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले. १९९२ मध्ये आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांनी संयुक्तपणे विश्वकप स्पर्धेचे यजमानपद भूषवले. त्यावेळी मार्टिन क्रोच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघाने सुरुवातीपासून चमकदार कामगिरी करीत उपांत्य फेरीत धडक मारली. पण, त्यावेळी त्यांच्या मार्गात पाकिस्तानने अडथळा निर्माण केला. आॅकलंडमध्ये खेळल्या गेलेल्या उपांत्य लढतीत मार्टिन क्रो (९१) व केन रुदरफोर्ड (५०) यांच्या कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडने ७ बाद २६१ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात खेळताना पाकिस्तानने विजयासाठी आवश्यक धावा ६ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. पाकिस्तानने प्रथमच अंतिम फेरी गाठली आणि जेतेपदाचा मान मिळविला.
२००७ च्या विश्वकप स्पर्धेत भारत व पाकिस्तान पहिल्याच फेरीत गारद झाल्यामुळे न्यूझीलंडला अंतिम चारमध्ये प्रवेश करताना विशेष कष्ट पडले नाही. उपांत्य फेरीत मात्र त्याला श्रीलंकेने रोखले. श्रीलंकेने या लढतीत ८१ धावांनी विजय मिळविला.
न्यूझीलंडने २०११ मध्येही उपांत्य फेरी गाठण्याची कामगिरी केली. त्यावेळी पुन्हा एकदा त्यांची वाटचाल श्रीलंका संघाने रोखली. आता न्यूझीलंड संघ सातव्यांदा नशीब बदलण्यासाठी प्रयत्नशील आहे.
दक्षिण आफ्रिका संघाला साखळी फेरीत दोन पराभव स्वीकारावे लागले असले तरी, त्यांनी संघातील उणिवा दूर करीत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेविरुद्ध एकतर्फी विजय मिळविला आहे.
दक्षिण आफ्रिका संघ १९९२ मध्ये प्रथमच विश्वकप स्पर्धेत सहभागी झाला होता. तेव्हापासून आजतागायत दक्षिण आफ्रिका संघ तीनदा उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरला आहे. १९९२ मध्ये उपांत्य फेरी गाठणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघापुढे डकवर्थ लुईस पद्धतीनुसार एका चेंडूवर २१ धावा फटकावण्याचे लक्ष्य होते. इंग्लंडविरुद्ध या लढतीत त्यांना २० धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर १९९९ मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध त्यांची लढत ’टाय’ झाली. पण सुपरसिक्समध्ये पिछाडीवर असल्यामुळे त्यांचे अंतिम फेरीचे स्वप्न भंगले. २००७ मध्ये त्यांना उपांत्य फेरीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. (वृत्तसंस्था)

Web Title: 'Cursed Gandharva'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.