CWG 2018: हरमनप्रीतचे दोन गोल, भारत उपांत्य फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 04:56 AM2018-04-11T04:56:08+5:302018-04-11T04:56:08+5:30
ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंगने नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर भारताने तुलनेने तळाच्या स्थानावर असलेल्या मलेशियाचा २-१ ने पराभव करीत राष्ट्रकुल गेम्समध्ये पुरुष हॉकी स्पर्धेत उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले.
ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंगने नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर भारताने तुलनेने तळाच्या स्थानावर असलेल्या मलेशियाचा २-१ ने पराभव करीत राष्ट्रकुल गेम्समध्ये पुरुष हॉकी स्पर्धेत उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. हरमनप्रीतने तिसऱ्या व ४४ व्या मिनिटाला गोल नोंदवले. मलेशियातर्फे एकमेव गोल फैजल सारीने १६ व्या मिनिटाला केला. भारताला या लढतीत ९ पेनल्टी कॉर्नर मिळाले. त्यात पहिला पेनल्टी कॉर्नर दुसºयाच मिनिटाला मिळाला. त्यावर गोल नोंदवत हरमनप्रीतने भारताला आघाडी मिळवून दिली.
प्रत्युत्तरात मलेशियाला सहाव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण रजी रहीम गोल करण्यात अपयशी ठरला. त्यानंतर १० मिनिटांनी फैजलने मैदानी गोल नोंदवित संघाला बरोबरी साधून दिली. मध्यंतरापर्यंत स्कोअर १-१ असा बरोबरीत होता. भारताला १८ व्या मिनिटाला आघाडी घेण्याची संधी होती, पण वरुण कुमारला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदविता आला नाही. त्यानंतर चार मिनिटांनी मनदीप सिंगचा प्रयत्न मलेशियन गोलकीपर हॅरी अब्दुल रहमानने निष्प्रभ ठरविला.
भारतीय गोलकीपर पी. आर. श्रीजेशने दुसºया हाफमध्ये मलेशियाचे दोन पेनल्टी कॉर्नर थोपविले. हरमनप्रीतने ४४ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवित भारताला आघाडी मिळवून दिली. ५८ व्या मिनिटाला त्याला हॅट््ट्रिक नोंदवण्याची संधी होती, पण रहमानने त्याचे प्रयत्न हाणून पाडले.
>भारतीय महिला हॉकी संघ १२ वर्षांनंतर उपांत्य फेरीत
कर्णधार राणीने ४७ व्या मिनिटाला नोंदवलेल्या गोलच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने मंगळवारी दक्षिण आफ्रिकेचा १-० ने पराभव करीत १२ वर्षांनंतर राष्ट्रकुल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. मॅन्चेस्टर राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकविजेत्या भारतीय संघाला अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी ही लढत अनिर्णीत राखणे गरजेचे होते, पण बचाव फळीचा शानदार खेळ आणि राणीने नोंदवलेल्या गोलच्या जोरावर भारतीय संघाने तीन गुणांची कमाई केली. या विजयासह भारताने ‘अ’ गटात ९ गुणांसह दुसरे स्थान पटकावताना उपांत्य फेरी गाठली. इंग्लंड संघाच्या खात्यावरही ९ गुणांची नोंद आहे, पण सरस गोल सरासरीमुळे हा संघ अव्वल स्थानी आहे. भारताला १२ एप्रिल रोजी खेळल्या जाणाºया उपांत्य लढतीत ‘ब’ गटातील अव्वल संघ आॅस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
>बॉक्सिंगमध्ये भारताचे पाचवे पदक निश्चित
अनुभवी मनोजकुमारने (६९ किलो) मंगळवारी राष्ट्रकुल स्पर्धेत पदक निश्चित केले. त्याच्याव्यतिरिक्त अन्य चार भारतीय बॉक्सर्सनी या स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मनोजव्यतिरिक्त प्रथमच या स्पर्धेत सहभागी होत असलेला अमित पंघाल (४९ किलो), मोहम्मद हसमुद्दीन (५६ किलो), १९ वर्षीय नमन तंवर (९१ किलो) आणि सतीश कुमार (९१ किलोपेक्षा अधिक) यांनी उपांत्य फेरी गाठताना पदक निश्चित केले. अमितने उपांत्यपूर्व फेरीत स्कॉटलंडच्या अकिल अहमदचा ४-१ ने पराभव केला. नमनने समोआच्या मासोईविरुद्ध ५-० ने वर्चस्व गाजवले.
>ट्रान्सजेंडरला करिअर
संपण्याची भीती...
राष्टÑकुल स्पर्धेतील पहिली न्यूझीलंडची ट्रान्सजेंडर भारोत्तोलक लॉरेल हबार्ड हिने जखमेमुळे करिअर संपुष्टात येणयाची भीती व्यक्त केली आहे. सोमवारी महिलांच्या ९० किलो गटावरील स्पर्धेत सर्वांत पुढे होती. त्याचवेळी स्पर्धेत सर्वाधिक वजन उचलण्याच्या नादात ती जखमी झाली. त्यानंतर तिने स्पर्धेतून माघार घेतली. यानंतर एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना हबार्डने शानदार करिअर संपुष्टात येण्याची भीती व्यक्त केली. हबार्डच्या खांद्याचे हाड सरकले आहे. ४० वर्षांच्या या खेळाडूने १० वर्षांआधी लिंग परिवर्तन केले. गॅव्हिनपासून ती लॉरेल बनली आहे.
>इंग्लंडची सायकलपटू स्पर्धेपासून वंचित
संघाच्या अधिकाºयाने नाव रजिस्टर केले नसल्याने प्रशासकीय त्रुटीचा फटका इंग्लंडच्या सायकलपटूला बसला. ती आता स्पर्धेत सहभागी होणार नाही. मेलिसा लोथर असे या खेळाडूचे नाव असून, तिला टाइम ट्रायलपासून वंचित राहावे लागले. पथकप्रमुखाने नाव टाकण्यासाठी मोठी धडपड केली, पण त्यांना अपयश आले. ‘प्रशासकीय चुकीमुळे माझे स्वप्न भंगले. किती निराश आहे, हे सांगू शकत नाही. या स्पर्धेसाठी कठोर मेहनत घेतली होती,’ असे मेलिसाने म्हटले आहे.
>नेमबाजाच्या
वडिलांकडे अवैध कार्ड
ब्रिस्बेन : भारताच्या एका महिला नेमबाजाच्या वडिलांकडे अवैध अॅक्रिडेशन कार्ड आढळून आल्यानंतर खेळाडूंसाठी असलेल्या लॉजकडे जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या या पित्याला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. याने आपल्या मुलीचा खासगी कोच होण्याचा दावा केला. भारतीय राष्टÑीय रायफल संघटनेचे अध्यक्ष रानिंदरसिंग यांनी त्याला बाहेर
जाण्यास सांगितले. रानिंदर यांना विचारताच त्यांनी नाव सांगण्यास नकार दिला.
>राष्ट्रकुल पदकतालिका
देश सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
आॅस्टेÑलिया ५० ३८ ४२ १३०
इंग्लंड २४ २९ २१ ७४
भारत ११ ०४ ०६ २१
न्यूझीलंड ०९ १० ०७ २६
द. आफ्रिका ०९ ०६ ०६ २१