CWG 2022:राष्ट्रकुल स्पर्धेत मोठी दुर्घटना! सायकलस्वार ट्रॅकवरून घसरले, रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 05:24 PM2022-08-01T17:24:04+5:302022-08-01T17:25:04+5:30
इंग्लंडमधील बर्गिंहॅम येथे राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे.
बर्गिंहॅम : इंग्लंडमधील बर्गिंहॅम येथे राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ (Commonwealth Games 2022)चे आयोजन करण्यात आले आहे, जिथे जगभरातील ७२ देशातील ॲथलीट सहभागी झाले आहेत. आपल्या देशातील खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी प्रत्येक देशातील प्रेक्षकांची संख्या देखील विक्रमी आहे. सर्वकाही सुरळीत सुरू असताना स्पर्धेला एका दुर्घटनेने गालबोट लावले आहे. कारण पुरुषांच्या १५ किमी स्क्रॅच सायकलिंग स्पर्धेदरम्यान एक अपघात झाला आहे.
वॉल्स गंभीर जखमी
इंग्लंडचा सायकलस्वार मॅट वॉल्स आणि कॅनाडाचा डेरेक जी या दोघांचा सायकलवरून अचानक तोल गेल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हे दोघेही सायकलचे ट्रॅक सोडून प्रेक्षकांमध्ये घुसले, ज्यामुळे मोठी दुर्घटना घडली. २४ वर्षीय वॉल्स गंभीर जखमी झाला आहे. तर आयल ऑफ मॅन सायकलपटू मॅथ्यू बोस्टॉकचा देखील या अपघातात समावेश होता. वॉल्स, डेरेक गी आणि बोस्टॉक या तिघांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
Awful crash involving Matt Walls and spectators. #velodrome#crash#cycling#CommonwealthGamespic.twitter.com/Lbk2KtuMKV
— Sky Sports 🇻 (@Sky5Sports) July 31, 2022
स्पर्धेच्या एका अधिकृत प्रवक्त्याने सांगितले की, "सायकलस्वारांचे अचानक संतुलन गेल्याने ही दुर्घटना झाली. यामध्ये काही प्रेक्षकांना देखील दुखापत झाली आहे मात्र सुदैवाने त्यांना जास्त दुखापत झाली नाही. तीन सायकलस्वारांवर प्रथम तिथेच उपचार करण्यात आले मात्र नंतर त्यांना रूग्णालयात दाखल केले. परंतु आता सर्व सायकलस्वारांची प्रकृती ठिक असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे."