CWG 2022:पाकिस्तानचे २ बॉक्सर बर्गिंहॅममधून बेपत्ता; गायब जलतरणपटूचाही अद्याप शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 10:18 AM2022-08-11T10:18:59+5:302022-08-11T10:22:43+5:30
राष्ट्रकुल स्पर्धेची सांगता होऊन आता ३ दिवस झाले आहेत.
बर्गिंहॅम : राष्ट्रकुल स्पर्धेची (CWG 2022) सांगता होऊन आता ३ दिवस झाले आहेत. मात्र अद्यापही काही ना काही कारणांवरून राष्ट्रकुल स्पर्धा सर्वांचे लक्ष वेधत आहे. दरम्यान, इंग्लंडमध्ये राष्ट्रकुल स्पर्धा खेळण्यासाठी गेलेले पाकिस्तानचे २ बॉक्सर बेपत्ता झाले आहेत. स्थानिक प्रशासनाकडून त्यांचा शोध सुरू आहे मात्र अद्याप त्यांना शोधण्यात यश आले नाही. याच वर्षीच्या जूनमध्ये हंगेरीतून एक पाकिस्तानी जलतरणपटूही बेपत्ता झाला होता, त्याचाही अद्याप शोध लागलेला नाही.
इंग्लंडमधील बर्गिंहॅम येथे राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ चा थरार रंगला होता. या बहुचर्चित स्पर्धेची सांगता ८ ऑगस्ट रोजी झाली. या स्पर्धेत तब्बल ७२ देशातील ५००० हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये पाकिस्तानमधील सुलेमान बलूच आणि नजीरूल्लाह या २ बॉक्सरचा समावेश होता. स्पर्धेची सांगता झाल्यानंतर देखील या दोन बॉक्सरपटूंनी संघ व्यवस्थापन कमिटीशी संपर्क साधला नाही. आता पाकिस्तान आणि लंडन मधील दोन्ही देशातील अधिकारी या दोन खेळाडूंचा शोध घेत आहेत.
जूनपासून बेपत्ता पाकिस्तानचा जलतरणपटू फैजान
जून महिन्यात पाकिस्तानचा जलतरणपटू फैजान बेपत्ता झाला होता. फैजान फिना हा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी गेला होता. लक्षणीय बाब म्हणजे फैजान या वर्ल्ड चॅम्पिनशिपमध्ये सहभागी देखील होऊ शकला नव्हता. बुडापेस्टमध्ये आल्यानंतर काही तासांतच तो त्याच्या पासपोर्ट आणि इतर कागदपत्रांसह गायब झाला असून अद्याप तो बेपत्ता आहे. जूनमध्ये बेपत्ता झालेल्या खेळाडूचा अद्याप शोध लागला नसताना पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला आहे.
श्रीलंकेचे १० खेळाडू बेपत्ता
राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताच्या शेजारील देश श्रीलंका देशातील देखील खेळाडू आले होते, मात्र राष्ट्रकुल स्पर्धा संपल्यानंतर १० श्रीलंकन खेळाडू बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये ९ ॲथलीट आणि एका मॅनेजरचा समावेश आहे. श्रीलंका सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे म्हणूनच हे १० जण आपल्या देशात परतण्यास तयार नाहीत असेही बोलले जात आहे. बेपत्ता झालेल्या खेळाडूंना शोधण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. श्रीलंका मागील काही महिन्यांपासून आर्थिक संकटात सापडला आहे. देशातील स्थिती एवढी गंभीर झाली आहे की लोकांना इंधनासाठी ५-६ दिवस रांगेत उभे राहावे लागत आहे. अशा स्थितीत श्रीलंकेचे नागरिक देश सोडून इतर देशात स्थायिक होत आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये ५१ अधिकाऱ्यांसह १६१ सदस्यांचा गट श्रीलंकेतून बर्गिंहॅमला गेला होता.