डी. गुकेश संयुक्त दुसऱ्या स्थानावर; प्रज्ञानानंदा आणि विदित गुजराती पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 07:09 AM2024-04-19T07:09:54+5:302024-04-19T07:10:23+5:30
प्रज्ञानानंदाला अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा आणि गुजरातीला रशियाच्या इयान नेपोम्नियाश्चिने पराभूत केले.
टोरंटो : भारताचा ग्रँडमास्टर डी. गुकेश कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेच्या ११व्या फेरीत अग्रमानांकित फॅबियानो कारूआना याच्याविरुद्ध ड्राॅनंतर संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. तर भारताच्या आर. प्रज्ञानानंदा आणि विदित गुजराती यांना पराभवाचा सामना करावा लागला.
प्रज्ञानानंदाला अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा आणि गुजरातीला रशियाच्या इयान नेपोम्नियाश्चिने पराभूत केले. अन्य सामन्यांत फ्रान्सच्या फिरोजा अलीरजाने अझरबैजानच्या निजात अबासोव याला पराभूत केले. स्पर्धेत आता तीन फेऱ्या शिल्लक आहेत आणि नेपोम्नियाश्चि सलग तिसऱ्यांदा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार ठरत आहे. रशियावर बंदी घालण्यात आल्यामुळे तो फिडेच्या ध्वजाखाली खेळत आहे. त्याने ११ पैकी सात गुण मिळवून आघाडी घेतली आहे.
कारूआना, नाकामुरा आणि गुकेश त्याच्यापेक्षा अर्ध्या गुणाने पिछाडीवर आहे. प्रज्ञानानंदाचे ५.५ आणि गुजरातीचे पाच गुण आहेत.
महिला गटात चीनच्या झोंग्यी तान हिला एकेरी आघाडी मिळाली आहे. तर चीनचीच टी लेइ दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताच्या आर. वैशालीने अग्रमानांकित रशियाच्या अलेक्झांड्रा गोरियाश्किना हिला पराभूत केले. तर कोनेरू हम्पीने बल्गेरियाच्या नूरगुल सलीमोवा हिला पराभूत केले.