माहीच्या खेळावर दादाचं प्रश्चचिन्ह
By admin | Published: April 13, 2017 02:51 PM2017-04-13T14:51:35+5:302017-04-13T14:52:24+5:30
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने महेंद्रसिंग धोनीच्या खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टी20 खेळासाठी योग्य नसल्याचं सांगितलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने महेंद्रसिंग धोनीच्या खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टी20 खेळासाठी योग्य नसल्याचं सांगितलं आहे. "धोनी एकदिवसीय खेळातील चॅम्पिअन खेळाडू आहे. पण टी20 मध्ये तो पहिल्यासारखा चांगला खेळाडू आहे की नाही याबाबत जरा साशंक आहे", असं सौरव गांगुली बोलला आहे.
"धोनी टी20 मधील चांगला खेळाडू आहे की नाही याबाबत मी खात्रीने सांगू शकत नाही. एकदिवसीय खेळातील तो चॅम्पिअन आहे. पण जेव्हा टी20 चा प्रश्न येतो तेव्हा गेल्या 10 वर्षात त्याने फक्त एकच अर्धशतक केलं असून हा इतका चांगला रेकॉर्ड नाही" अशी प्रतिक्रिया सौरव गांगुलीने दिली आहे. धोनीच्या आयपीएलमधील ढासळत्या कामगिरीवर बोलताना गांगुलीने हे वक्तव्य केलं आहे.
आयपीएलमध्ये खेळत असताना पहिल्यांदाच महेंद्रसिंग धोनी कर्णधार म्हणून नाही तर संघाचा खेळाडू म्हणून खेळत आहे. धोनी पुणे संघाकडून खेळत असून संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी स्टीव्ह स्मिथवर सोपवण्यात आली आहे. धोनीची या सत्रातील कामगिरीही निराशाजनक राहिली आहे.
धोनीने तीन सामन्यांमध्ये अनुक्रमे 12, 5 आणि 11 धावा केल्या आहेत. एकदिवसीय आणि टी20मध्ये भारतीय संघासाठी सर्वात यशस्वी कर्णधार ठरलेला महेंद्रसिंग धोनी आयपीएलमध्ये मात्र अयशस्वी ठरला आहे.
"धोनीने कामगिरी दाखवत धावा केल्या तर त्याचा चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी विचार केला जाईल", असंही सौरव गांगुला बोलला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने देखील धोनीने चांगली कामगिरी करणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.
गेल्या पर्वात धोनीने 14 सामन्यांमध्ये 135.23 च्या स्ट्राईक रेटने 248 धावा केल्या. धोनीच्या संपुर्ण आयपीएलमधील रेकॉर्डला पाहायचं गेल्यास त्याने 39.40 ची सरासरी आणि 138.95 च्या स्ट्राईक रेटने 143 सामन्यात 3721 धावा केल्या आहेत. मात्र चाहत्यांना धोनीकडून शतक पाहायला मिळालेलं नाही. धोनी एक उत्तम मॅच फिनिशर असून जोरदार फटके लगावतो. मात्र आजपर्यंत तो शतक करु शकलेला नाही. या पर्वात तरी चाहत्यांची ही प्रतिक्षा संपेल अशी आशा आहे.