द.आफ्रिकेला पहिल्या विजयाची संधी

By admin | Published: March 20, 2016 04:12 AM2016-03-20T04:12:24+5:302016-03-20T04:12:24+5:30

शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सलामीच्या सामन्यात इंग्लंडविरुध्द २२९ धावा उभारल्यानंतरही पराभवास सामोरे जावे लागल्यानंतर दक्षिण आफ्रिका पुन्हा एकदा याच स्टेडियमवर

D.Africa's chance of winning the first | द.आफ्रिकेला पहिल्या विजयाची संधी

द.आफ्रिकेला पहिल्या विजयाची संधी

Next

मुंबई : शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सलामीच्या सामन्यात इंग्लंडविरुध्द २२९ धावा उभारल्यानंतरही पराभवास सामोरे जावे लागल्यानंतर दक्षिण आफ्रिका पुन्हा एकदा याच स्टेडियमवर रविवारी विजयी मार्गावर येण्यास उतरेल. यावेळी आव्हान असेल ते दुबळ्या अफगाणिस्तानचे. त्यामुळे ही लढत मोठ्या फरकाने जिंकून टी२० विश्वचषकमधील पहिला विजय मिळवताना धावगती सुधारण्याच्या प्रयत्नात आफ्रिकन्स असतील.
मजबूत फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडपुढे भलेमोठे आव्हान ठेवल्यानंतरही पराभूत झाल्याने आफ्रिकेसमोर गोलंदाजांची कामगिरी चिंतेचा विषय बनला आहे. त्याचवेळी क्षेत्ररक्षकांकडूनही चुका झाल्याचा फटका बसल्याने क्षेत्ररक्षणातही सुधारणा करण्याचे आव्हान दक्षिण आफ्रिकेपुढे आहे. अनुभवी इम्रान ताहीरचा अपवाद वगळता आफ्रिकेचे सर्व गोलंदाज चांगलेच महाग ठरले. इंग्लंडविरुध्द ३ बळी घेत काएल एबॉट जरी यशस्वी ठरला असला, तरी त्याने ११.१८ च्या धावगतीने धावा दिल्या होत्या. त्यामुळेच अफगाणिस्तानविरुद्ध एबॉटसह, कागिसो रबाडा, डेल स्टेन, ख्रिस मॉरीस आणि जेपी ड्युमिनी यांना या सामन्यातून आपली लय मिळवण्याची चांगली संधी असेल. त्याचवेळी फलंदाजी मात्र जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. हाशिम आमला, क्विंटन डीकॉक, जेपी ड्युमिनी यांनी तडाखेबंद अर्धशतक झळकावत आफ्रिकेला मजबूत धावसंख्या उभारुन दिली होती. तर धडाकेबाज एबी डिव्हिलियर्स, फाफ डू प्लेसिस आणि डेव्हीड मिल्लर आक्रमक सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले होते. मात्र अफगाणिस्तानविरुध्द हे तिघेही चांगला सराव करून घेतील.
दुसरीकडे वेगवान गोलंदाज असगर स्टेनिकजईच्या नेतृत्वाखाली नवखे अफगाणिस्तान स्वत:ला पारखण्यासाठी खेळतील. गेल्या काही महिन्यांमध्ये कमालीचा खेळ सुधारताना अफगाणिस्तानने क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधले. मात्र तरीही दक्षिण आफ्रिकासारख्या तगड्या संघाला नमवण्यासाठी त्यांना एका चमत्काराचीच आवश्यकता असेल.
मोहम्मद नाबी आणि राशिद खान या फिरकी जोडीने प्रत्येकी ७ बळी घेत स्पर्धेत अग्रस्थान पटकावले आहे. मात्र आफ्रिकेच्या मजबूत फलंदाजीविरुध्द त्यांच खरी कसोटी लागेल. अफगाणिस्तान आणि दक्षिण अफ्रिका या संघामध्ये आतापर्यंत केवळ एक सामना झाला असून यामध्ये आफ्रिकाने ५९ धावांनी बाजी मारली आहे. (क्रीडा प्रतिनिधी)

संघ यातून निवडणार
दक्षिण आफ्रिका : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), काएल एबॉट, हाशिम आमला, फरहान बेहरदीन, क्विंटन डीकॉक, एबी डिव्हिलियर्स, जेपी ड्युमिनी, इम्रान ताहीर, डेव्हीड मिल्लर, ख्रिस मॉरीस, अ‍ॅरॉन फागिसो, कागिसो रबाडा, रिली रोसेयू, डेल स्टेन आणि डेव्हीड वीसे.
अफगाणिस्तान : असगर स्टेनिकजई (कर्णधार), मोहम्मद शहजाद, नूर अली जादरान, उस्मान घनी, मोहम्मद नाबी, करीम सादिक, शफीकुल्लाह शाफिक, रशिद खान, अमीर हमला, दवलत जादरान, शापूर जादरान, गुलबेदीन नैब, समीउल्लाह शेनवारी, नजीबुल्लाह जादरान आणि हामिद हसन.
सामन्याची वेळ दुपारी ३.००. स्थळ : वानखेडे स्टेडियम, मुंबई

Web Title: D.Africa's chance of winning the first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.