दहिसरची पूर्णा रावराणे जागतिक स्पर्धेसाठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2016 03:08 AM2016-06-27T03:08:01+5:302016-06-27T03:08:01+5:30
तुर्की येथे आगामी ११ ते १८ जुलै दरम्यान होणाऱ्या जागतिक शालेय क्रीडा स्पर्धेसाठी दहिसरच्या विद्या प्रसारक मंडळ क्लबच्या (व्हीपीएम) पूर्णा रावराणेची निवड झाली
रोहित नाईक,
मुंबई- तुर्की येथे आगामी ११ ते १८ जुलै दरम्यान होणाऱ्या जागतिक शालेय क्रीडा स्पर्धेसाठी दहिसरच्या विद्या प्रसारक मंडळ क्लबच्या (व्हीपीएम) पूर्णा रावराणेची निवड झाली आहे. गोळाफेक प्रकारात सातत्याने राष्ट्रीय स्तरावर छाप पाडत आपला दबदबा निर्माण केल्यानंतर पूर्णाची तुर्की येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांत पदकांची लयलूट केलेल्या पूर्णाने जागतिक स्पर्धेत भारतासाठी अभिमानास्पद कामगिरीचा निर्धार केला असून तीने यानिमित्ताने ‘लोकमत’शी संवाद साधला.
वडिल सुबोध रावराणे यांच्यामुळे खेळाकडे वळालेल्या पूर्णाने सांगितले की, ‘‘माझे वडिल स्वत: राष्ट्रीय बॉक्सर असल्याने त्यांच्याकडूनच मला सातत्याने प्रेरणा मिळाली. तसेच माझी मोठी बहिण कस्तुरीही राष्ट्रीय स्तराची हर्डलर असून तीच्याकडून खूप मदत होत असते. वडिलांनी प्रोत्साहान दिल्यानंतर मी अॅथलेटीक्समध्ये सुरुवातीला धावण्याच्या शर्यतीकडे लक्ष दिले. मात्र नंतर वयाच्या १२व्या वर्षी केवळ एक बदल म्हणून गोळाफेककडे वळाले आणि तेव्हा पासून यामध्ये अधिक यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करीत आहे.’’
दहिसर येथील रुस्तुमजी इंटरनॅशनल स्कूलमध्ये १०वीमध्ये शिकत असलेल्या पूर्णाने सांगितले की, ‘‘खेळ आणि अभ्यास यांचा ताळमेळ साधण्यात मला शाळेचे खूप सहकार्य मिळते. कधी कोणता अभ्यास बुडाला तर त्यासाठीही मला शाळेतून मदत होते.’’ शिवाय ‘‘आई (सुप्रीया) माझ्या अभ्यासाकडे विशेष लक्ष देऊन असल्याने माझ्या अभ्यासाचे नुकसान होत नाही,’’ असेही यावेळी पूर्णाने आवर्जुन सांगितले. इतर खेळांच्या तुलनेत अॅथलेटीक्स आणि त्यातही गोळाफेकीला कोणतेही ग्लॅमर नसताना या खेळाकडे का वळालीस, यावर पूर्णा म्हणाली की, ‘‘ सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करुन या खेळालाही मला वरती आणायचे आहे. तसेच भारतात केवळ एकंच किंवा मर्यादित खेळ नसून इतरही खेळ आहेत आणि त्यातही आम्ही मागे नाही, हे सिध्द करायचे आहे.’’
भविष्यातील कामगिरीविषयी पूर्णाने सांगितले की, ‘‘सध्या मी जागतिक शालेय स्पर्धेकडे लक्ष केंद्रीत केले असून यानंतर सातत्याने माझ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा होतील. त्यात, आशियाई, वर्ल्ड स्कूल आणि आणखी तीन- चार स्पर्धा आहेत. या सर्व स्पर्धांतून यशस्वी कामगिरी केल्यानंतर मला भविष्यात आॅलिम्पिकमध्ये देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करायची आहे.’’
>असे आहे दिवसाचे वेळापत्रक
जागतिक स्पर्धेसाठी सध्या खडतर मेहनत घेत असलेल्या पूर्णाचे दिवसाचे वेळापत्रकही खूप व्यस्त आहे. सकाळच्या सरावानंतर शाळा आणि क्लासेस संपवून पुन्हा ती संध्याकाळी दोन तास सराव करते. तसेच आठवड्यातील एक दिवस सुटटी घेऊन आराम करण्यावरही तीचा भर असतो.
जागतिक शालेय स्पर्धेत गोळाफेकीचा १८ मीटरचा विक्रम मला मोडायचा आहे. ही कामगिरी कठीण असली तरी अशक्य नक्कीच नाही. त्यासाठी जोरदार प्रयत्न करतेय. मी अजून १४ मीटरपर्यंत फेक करीत असून क्षमता वाढवतेय. त्याचबरोबर या स्पर्धेत रशिया आणि चीन सारख्या स्पर्धांकडून अधिक स्पर्धेची अपेक्षा आहे.
- पूर्णा रावराणे
गेल्या तीन वर्षांत पूर्णाने अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांत आपली छाप पाडली असून मुख्य प्रशिक्षक संतोष आंब्रे व हिरेन जोशी यांच्यामुळे यशस्वी कामगिरी करु शकले, अशी भावना पूर्णाने व्यक्त केली. २०१३ सालापासून पूर्णाने आतापर्यंत पूर्णाने ५० सुवर्ण, २५ रौप्य आणि १० कांस्य पदकांची लयलूट केली आहे. कोझीकोडे येथे २९ - ३० मे दरम्यान झालेल्या दोनदिवसीय राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत पूर्णाने १३.२५ मीटरची फेक करुन सुवर्ण पटकावून भारतीय संघातील जागा निश्चित केली.