डेल पेट्रोने केले वावरिंकाला ‘आऊट’
By admin | Published: July 2, 2016 05:55 AM2016-07-02T05:55:48+5:302016-07-02T05:55:48+5:30
स्वीत्झर्लंडच्या स्टेनिसलॉस वावरिंका याला ३-६, ६-३, ७-६, ६-३ असे पराभूत करीत विम्बल्डन टेनिस स्पर्धेतून ‘आऊट’ केले
लंडन : अमानांकित अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पेट्रो याने पुरुषांच्या गटात सर्वात खळबळजनक निकालाची नोंद करताना चौथ्या मानांकित स्वीत्झर्लंडच्या स्टेनिसलॉस वावरिंका याला ३-६, ६-३, ७-६, ६-३ असे पराभूत करीत विम्बल्डन टेनिस स्पर्धेतून ‘आऊट’ केले आहे.
२७ वर्षीय डेल पेट्रो याने दुसऱ्या फेरीतील ही लढत २ तास ४३ मिनिटांत जिंकली. डेल पेट्रोने पहिला सेट गमाविल्यानंतर जबरदस्त मुसंडी मारताना मोठा विजय मिळविला. वावरिंकाने बॅकहँडवर निरर्थक चुका केल्या आणि सामना गमाविला. डेल पेट्रोने तिसरा सेट टायब्रेकमध्ये ७-२ ने जिंकला. त्यानंतर चौथ्या सेटमध्ये वावरिंकाला डोके वर काढण्याची उसंतच मिळू दिली नाही.
अर्जेंटिनाच्या खेळाडूने १0 पैकी ४ ब्रेक गुण, तर वावरिंकाने ५ पैकी तीन ब्रेक गुण जिंकले. डेल पेट्रोने सामन्यात ९ बिनतोड सर्व्हिस केली आणि पहिल्या सर्व्हिसवर त्याचे गुण जिंकण्याची टक्केवारी वावरिंकाच्या तुलनेत जास्त होती.
स्पर्धेचा पाचव्या दिवशी पावसाचा व्यत्यय आला; परंतु याच दिवशी सेंटर कोर्टवर छताखालील झालेल्या पुरुष एकेरीच्या लढतीत सनसनाटी निकाल नोंदवला गेला. त्याआधी काल महिला एकेरीत द्वितीय मानांकित स्पेनची गर्बाइन मुगुरुजाला स्लोव्हाकियाच्या याना सेपेलोव्हाने ६-३, ६-२ असे सलग सेटमध्ये पराभूत केले. (वृत्तसंस्था)
>ट्रायकीने पंचांना म्हटले ‘मूर्ख’, जगातील सर्वांत वाईट’
सर्बियाचा व्हिक्टर ट्रायकी याने गुरुवारी विम्बल्डनच्या जुन्या टोमणेबाजीची आठवण ताजी करताना पंचांना ‘मूर्ख’ आणि ‘जगातील सर्वांत’ वाईट असे म्हटले.सर्बियाच्या २५ व्या मानांकित ट्रायकीला स्पेनच्या अल्बर्ट
रामोस विनोलास याच्याविरुद्ध ३-६, ६-३, २-६, ६-३ असा पराभव पत्करावा लागला आणि यादरम्यान पंच डेमियानो टोरेला याला एक गुण देण्याच्या निर्णयामुळे त्याला मॅच पॉइंटचा सामना करावा लागला.
स्पेनच्या रामोसची एक सर्व्हिस पंचांनी ‘आऊट’ ठरवली; परंतु त्यानंतर निर्णय बदलताना
त्याला बिनतोड सर्व्हिस ठरवली. त्यामुळे कोर्ट १७ वर ट्रायकी नाराज झाला व तो पुढच्याच पॉइंटवर पराभूत झाला.
ट्रायकीने निर्णय बदलल्यानंतर म्हटले, ‘‘पाहा, पांढऱ्या ठिकाणी काहीही लागलेले नाही पाहा. कृपा करून एकदा तरी पाहा. तुम्ही जगातील सर्वांत वाईट पंच आहात.’’ त्यानंतर त्याने चेंडू कोर्टच्या बाहेर फेकून दिला. त्याच्या वर्तनामुळे त्याला आचारसंहितेच्या उल्लंघनाचा सामना करावा लागला.