स्वप्न पाहण्याचे धाडस केल्याने यशस्वी
By admin | Published: September 14, 2016 05:11 AM2016-09-14T05:11:05+5:302016-09-14T05:11:05+5:30
मी स्वप्न पाहिले आणि त्याहून महत्त्वाचे ते स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत दाखवली; म्हणून पदक मिळविण्यात यशस्वी ठरले, अशी प्रतिक्रिया पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक मिळविणारी पहिला
नवी दिल्ली : मी स्वप्न पाहिले आणि त्याहून महत्त्वाचे ते स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत दाखवली; म्हणून पदक मिळविण्यात यशस्वी ठरले, अशी प्रतिक्रिया पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक मिळविणारी पहिला भारतीय महिला खेळाडू दीपा मलिकने दिली. रिओ पॅरालिम्पिकमध्ये दीपाने एफ.५३ प्रकारात गोळाफेक स्पर्धेत भारताला रौप्यपदक मिळवून देऊन अभिमानास्पद कामगिरी केली.
दीपाने सांगितले, ‘‘मी स्वप्न पाहण्याचे धाडस केले. त्याचप्रमाणे कठोर मेहनत घेण्याची माझी तयारी असल्याने त्या जोरावर मी माझे स्वप्न पूर्ण करू शकले. बहुतेक महिला ही संधी घालवतात; परंतु माझा निर्धार पक्का होता. मी माझ्या परिवाराकडेही कधी दुर्लक्ष केले नाही.’’ कमरेखालील भागामध्ये अर्धांगवायूचा झटका आलेल्या दीपावर पाठीच्या कण्यातील असलेल्या ट्युमरवर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर ती सुमारे १७ वर्षांपासून व्हीलचेअरवर आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे, दीपावर तब्बल ३१ शस्त्रक्रिया झालेल्या आहेत.
पदक जिंकल्यानंतर दीपा म्हणाली, ‘‘हे पदक जिंकून मी खूप आनंदी आहे आणि देशासाठी हे पदक जिंकल्याने त्याचा आनंद अधिक आहे. माझे प्रशिक्षक, भारतीय क्रीडा प्रधिकारण आणि क्रीडा मंत्रालयाची मी आभारी आहे. शिवाय, माझे टे्रनर असलेले माझे पती यांची मी खूप आभारी आहे. माझ्या मुली माझी ताकद आणि प्रेरणा आहेत. मायदेशी परतण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.’’
त्याचप्रमाणे, ‘‘मी आधी बाइकर, जलतरणपटू आणि रॅली ड्रायव्हर होते. आता देशाची पहिली महिला पॅरालिम्पिक पदकविजेती ठरले आहे. ही खूप मोठी बाब आहे. याचे श्रेय मी माझा परिवार आणि देशाला देईन.’’ (वृत्तसंस्था)
४ कोटींचे
रोख पारितोषिक...
हरियाणा सरकारने आपल्या क्रीडा धोरणानुसार दीपा मलिकला ४ कोटी रुपयांचे रोख पारितोषिक देण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे, रिओ आॅलिम्पिकमध्ये कुस्तीत कांस्यपदक पटकावणारी भारतीय महिला मल्ल साक्षी मलिक हीदेखील हरियाणा राज्याचीच आहे. वरुणला एक कोटी मिळणार...
रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत उंच उडी खेळामध्ये कांस्य पटकावलेला वरुण भाटी याला उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली. यूपी सरकारच्या अधिकृत पत्राद्वारे मुख्यमंत्री अखिलेश यांनी सांगितले, ‘‘वरुणने मेहनत आणि समर्पण या जोरावर देशाचे आणि राज्याचे नाव उंचावले आहे. त्याच्या या यशामुळे इतर दिव्यांग खेळाडूंना प्रेरणा मिळेल.’’
राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा...
दीपाने मिळविलेल्या यशाचे अभिनंदन करताना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सांगितले, ‘‘दीपाने मिळविलेले यश सर्व भारतीयांसाठी गौरवास्पद आहे. प्रत्येक खेळाडूसह देशातील शारीरिकरीत्या कमजोर असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठीदेखील दीपाचे यश प्रेरणादायी आहे. दीपाच्या यशाने सिद्ध होत आहे, की मेहनत आणि समर्पणाच्या जोरावर ध्येय आणि यश मिळविता येते. भविष्यातील वाटचालीसाठी मी दीपाला शिभेच्छा देतो.’’