डेअरडेव्हिल्स हॅट्ट्रिकसाठी उत्सुक
By admin | Published: April 20, 2015 01:32 AM2015-04-20T01:32:00+5:302015-04-20T01:32:00+5:30
सलग दोन विजय नोंदविल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला दिल्ली डेअरडेव्हिल्स संघ इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध
नवी दिल्ली : सलग दोन विजय नोंदविल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला दिल्ली डेअरडेव्हिल्स संघ इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीत विजयाची हॅट््ट्रिक नोंदविण्यास उत्सुक आहे. कोटला मैदान हे गंभीरचे ‘होम ग्राउंड’ असून, यावर त्याच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. पहिल्या दोन सामन्यांत चेन्नई सुपरकिंग्स व राजस्थान रॉयल्सविरुद्ध निसटता पराभव स्वीकारावा लागल्यानंतर, दिल्ली संघाने गेल्या दोन्ही सामन्यांत किंग्स इलेव्हन पंजाब व सनराइजर्स हैदराबाद संघांविरुद्ध विजय मिळविला.
आयपीएलच्या गेल्या मोसमात तळाच्या स्थानावर असलेल्या डेअरडेव्हिल्स संघासाठी कोटलाचे गृहमैदान मात्र ‘लकी’ ठरलेले नाही. दिल्ली संघाने गृहमैदानावर अखेरचा विजय दोन वर्षांपूर्वी २१ एप्रिल २०१३ रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध मिळवला होता. त्यानंतर दिल्ली संघाला या मैदानावर सलग आठ सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे. गेल्या वर्षी कोटला मैदानावर खेळल्या गेलेल्या सर्व पाचही सामन्यांत डेअरडेव्हिल्स संघाला पराभवाला सामोरे जावे लागले, तर यंदाच्या मोसमातही रॉयल्सविरुद्ध सलामी लढतीत दिल्ली संघाला पराभव स्वीकारावा लागला.
दुसऱ्या बाजूचा विचार करता गतचॅम्पियन कोलकाता नाइट रायडर्स संघ फॉर्मात असल्याचे दिसून येत आहे. संघासाठी गोलंदाजी ही चिंतेची बाब आहे. प्रत्येक लढतीत केकेआरविरुद्ध प्रतिस्पर्धी संघ मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला आहे. फलंदाजी हे या संघाचे शक्तिस्थळ आहे.
झहीर खान व मोहम्मद शमी दुखापतग्रस्त असल्यामुळे दिल्ली संघाला त्याची झळ बसली आहे. शमीने स्पर्धेतून माघार घेतली आहे. फिरकीपटूंनी काही अंशी भरपाई करण्याचा प्रयत्न केला आहे; पण संघाला आगामी सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाजांकडून चमकदार कामगिरीची आशा आहे.
डेअरडेव्हिल्स संघाला कर्णधार जे. पी. ड्यूमिनीकडून चमकदार कामगिरीची आशा आहे. ड्यूमिनीने गेल्या लढतीत सनराइजर्सविरुद्ध ५४ धावांची खेळी केली आणि त्यानंतर १७ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. ड्यूमिनीने या स्पर्धेत आतापर्यंत ७ बळी घेतले असून, सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो दुसऱ्या स्थानावर आहे.
सलामीवीर मयंक अग्रवाल व श्रेयस अय्यर यांनी काही चांगल्या खेळी केलेल्या आहेत. फलंदाजीमध्ये ड्यूमिनी संघाचा सर्वांत यशस्वी खेळाडू ठरला आहे. त्याने आतापर्यंत १२४ धावा फटकावल्या आहेत. मयंकने १२१, तर अय्यरने ११३ धावा केलेल्या आहेत.
दुसऱ्या बाजूचा विचार करता केकेआर संघाची भिस्त कर्णधार गौतम गंभीरच्या कामगिरीवर अवलंबून आहे. मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघांविरुद्ध अनुक्रमे ५७ व ५८ धावांची खेळी करणाऱ्या गंभीरने आतापर्यंत १२६ धावा फटकावल्या आहेत. गेल्या स्पर्धेत शानदार कामगिरी करणारा दुसरा सलामीवीर रॉबिन उथप्पाला आतापर्यंत मात्र छाप सोडता आलेली नाही. सूर्यकुमार यादव व युसूफ पठाण यांनाही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही, तर बांगला देशचा साकीब अल-हसन राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मायदेशी परतल्यामुळे संघात स्थान देण्यात आलेला रॅनटेन डोएशे मिळालेल्या संधीचा लाभ घेण्यात अपयशी ठरला.
गोलंदाजी संघासाठी चिंतेचा विषय आहे. सुनील नारायण बदललेल्या शैलीने प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला आहे. गेल्या वर्षी संघाला जेतेपद पटकावून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नारायणला यावेळी तीन सामन्यांत केवळ एकच बळी घेता आला. वेगवान गोलंदाज उमेश यादव व मोर्ने मोर्कल यांनाही अद्याप विशेष यश मिळविता आलेले नाही. अष्टपैलू आंद्रे रसेलची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. शनिवारी किंग्स इलेव्हनविरुद्ध त्याने दोन बळी घेतले आणि त्यानंतर ३६ चेंडूंत ६६ धावांची खेळी करीत संघाला विजय मिळवून दिला. (वृत्तसंस्था)