डेअरडेव्हिल्स-लायन्स प्रतिष्ठेसाठी खेळणार
By admin | Published: May 10, 2017 01:03 AM2017-05-10T01:03:09+5:302017-05-10T01:03:09+5:30
प्ले आॅफच्या शर्यतीतून बाहेर पडलेले गुजरात लायन्स व दिल्ली डेअरडेव्हिल्स हे संघ बुधवारी आयपीएलच्या दहाव्या पर्वातील लीग सामन्यात प्रतिष्ठेसाठी खेळणार आहेत.
कानपूर : प्ले आॅफच्या शर्यतीतून बाहेर पडलेले गुजरात लायन्स व दिल्ली डेअरडेव्हिल्स हे संघ बुधवारी आयपीएलच्या दहाव्या पर्वातील लीग सामन्यात प्रतिष्ठेसाठी खेळणार आहेत.
दिल्ली संघाला ११ लढतींमध्ये केवळ ८ गुणांची कमाई करता आली. सोमवारी सनरायजर्स हैदराबाद संघाने मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवल्यानंतर दिल्ली संघाची प्ले आॅफ फेरी गाठण्याची आशा संपुष्टात आली. यंदाच्या मोसमात चार विजय व सात पराभव स्वीकारणारा दिल्ली संघ कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरला. सनरायजर्स व गुजरात या संघांना आपले गृहमैदान फिरोजशाह कोटलावर पराभूत केल्यानंतर, दिल्ली संघाच्या प्ले आॅफच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
गृहमैदानावर गेल्या लढतीत मुंबईविरुद्ध केवळ ६६ धावांत गारद झाल्यानंतर १४६ धावांनी स्वीकारावा लागलेला पराभव दिल्ली संघाला महाग पडला. गुजरात संघाला अनुभवहीन गोलंदाजीचा फटका बसला. या संघाला केवळ चार सामने जिंकता आले, तर आठ सामन्यांत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. गुणतालिकेत हा संघ सहाव्या स्थानी आहे. उभय संघ आता केवळ प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार आहेत.
यापूर्वी उभय संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या लढतीत दिल्ली संघाने गुजरात लायन्सचा ७ गडी राखून पराभव केला होता. त्यात युवा रिषभ पंतने ४३ चेंडूंमध्ये ९७ धावा केल्या होत्या. संजू सॅमसनने ३१ चेंडूंमध्ये ६१ धावांची खेळी केली होती.
दुसऱ्या बाजूचा विचार करता गुजरातला यशस्वी गोलंदाज अॅण्ड्य्रू टायची उणीव भासत आहे. दुखापतीमुळे हा गोलंदाज मायदेशी परतला आहे. आता सलामीवीर ब्र्रँडन मॅक्युलम हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. वेगवान गोलंदाज बासिल थम्पीवर गोलंदाजीचा भार राहणार आहे. त्याने आतापर्यंत १० बळी घेतले आहेत. फलंदाजीमध्ये कर्णधार रैना व कार्तिक यांनी बाजू सांभाळलेली आहे.
प्रतिस्पर्धी संघ
दिल्ली डेअरडेव्हिल्स : झहीर खान (कर्णधार), मोहम्मद शमी, शाहबाज नदीम, जयंत यादव, अमित मिश्रा, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, करुण नायर, रिषभ पंत, सी.वी.मिलिंद, खलील अहमद, प्रत्युष सिंग, मुरुगन अश्विन, आदित्य तारे, शशांक सिंग, अंकित बावणे, नवदीप सैनी, कोरे अँडरसन, अँजेलो मॅथ्यूज, पॅट कमिंस, कागिसो रबादा, ख्रिस मॉरिस, कार्लोस ब्रेथवेट, सॅम बिलिंग्स.
गुजरात लायन्स : सुरेश रैना (कर्णधार), अक्षदीप नाथ, शुभम अग्रवाल, बासिल थम्पी, ड्वेन स्मिथ, चिराग सूरी, जेम्स फॉकनर, अॅरोन फिंच, मनप्रीत गोनी, ईशान किशन, रवींद्र जडेजा, शादाब जकाती, दिनेश कार्तिक, धवल कुलकर्णी, प्रवीण कुमार, बँ्रडन मॅकुलम, प्रदीप सांगवान, जैसन राय, जयदेव शाह, शैली शौर्य, नत्थु सिंग, तेजस बारोका आणि अॅण्ड्य्रू टाय.