डेअरडेव्हिल्स विजयी
By admin | Published: April 24, 2016 03:58 AM2016-04-24T03:58:42+5:302016-04-24T03:58:42+5:30
संजू सॅमसनच्या (६०) अर्धशतकी खेळीनंतर लेग स्पिनर अमित मिश्राच्या (२४ धावांत २ बळी) अचूक माऱ्याच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने गृहमैदान फिरोजशाह कोटलावर खेळताना
नवी दिल्ली : संजू सॅमसनच्या (६०) अर्धशतकी खेळीनंतर लेग स्पिनर अमित मिश्राच्या (२४ धावांत २ बळी) अचूक माऱ्याच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने गृहमैदान फिरोजशाह कोटलावर खेळताना शनिवारी गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा १० धावांनी पराभव केला आणि आयपीएलच्या नवव्या पर्वात आपल्या तिसऱ्या विजयाची नोंद केली.
दिल्ली डेअरडेव्हिल्सने ४ बाद १६४ धावांची आव्हानात्मक मजल मारली आणि लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या मुंबई इंडियन्सचा डाव ७ बाद १५४ धावांत रोखला. दिल्ली संघाचा चार सामन्यांतील हा तिसरा विजय ठरला, तर मुंबई संघाचा सहा सामन्यातील हा चौथा पराभव ठरला.
मुंबई संघाची भिस्त कर्णधार रोहित शर्मावर होती. आतापर्यंत मुंबई संघाने मिळवलेल्या दोन्ही विजयांमध्ये रोहितने अर्धशतकी खेळी केली आहे. रोहितने ४८ चेंडूंना सामोरे जाताना ७ चौकार व १ षटकाराच्या मदतीने शानदार ६५ धावा फटकावल्या. मुंबई संघाला अखेर १० धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
मुंबई संघासाठी कर्णधार रोहितचे अखेरच्या षटकात धावबाद होणे दुर्दैवी ठरले. मुंबईला अखेरच्या षटकात विजयासाठी २१ धावांची गरज होती. रोहितने ख्रिस मॉरिसच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला, पण तिसऱ्या चेंडूवर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात त्याची सहकारी हार्दिक पंड्यासोबत टक्कर झाली आणि पवन नेगीच्या थेट थ्रोवर तो धावबाद झाला.
लेग स्पिनर अमित मिश्राने मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मिश्राने सुरुवातीला अंबाती रायुडूला (२५) क्लिन बोल्ड केले तर जोस बटलरला (२) पायचित केले. दिल्लीचा कर्णधार झहीर खानने आपल्याच षटकात कृणाल पंड्याला (३६) धावबाद केले. किरॉन पोलार्डला (१९) झहीरने तंबूचा मार्ग दाखवला. मिश्राने दोन, तर मॉरिस व झहीर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. त्याआधी, संजू सॅमसन (६०)
व जेपी ड्युमिनी (नाबाद ४९)
यांच्या शानदार खेळीच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने ४ बाद १६४ धावांची मजल मारली. सॅम्सनने ४८ चेंडूंना सामोरे जाताना ६० धावा फटकावल्या. त्यात चार चौकार
व २ षटकारांचा समावेश आहे. सॅमसनने ड्युमिनीसोबत चौथ्या विकेटसाठी ८.३ षटकांत ७१ धावांची भागीदारी केली. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक
दिल्ली डेअरडेव्हिल्स : क्विंटन डिकाक झे. पंड्या गो. मॅक्लेनघन ०९, श्रेयस अय्यर झे. रायुडू गो. पंड्या १९, संजू सॅमसन झे. साऊदी गो. मॅक्लेनघन ६०,जे.पी. ड्युमिनी नाबाद ४९, पवन नेगी नाबाद १०. अवांतर (१२). एकूण २० षटकांत ४ बाद १६४. गोलंदाजी : मॅक्लेनघन २/३१, हार्दिक पंड्या १/७, हरभजन १/२४,
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा धावबाद ६५, अंबाती रायुडू त्रि. गो. मिश्रा २५, कृणाल पंड्या धावबाद ३६, पोलार्ड झे. मॉरिस गो. झहीर १९; अवांतर (३). एकूण २० षटकांत ७ बाद १५४. गोलंदाजी : झहीर १/३०, मॉरिस १/२७, मिश्रा २/२४.