भारताकडून दिनामो स्टरोइटेल पराभूत
By admin | Published: July 11, 2016 03:55 AM2016-07-11T03:55:54+5:302016-07-11T03:55:54+5:30
वरुणकुमार, सिमरनजितसिंह व विक्रमजित यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी एक गोलच्या जोरावर भारतीय ज्युनिअर हॉकी संघाने युरेशिया चषक हॉकी स्पर्धेत आपल्या पहिल्या लढतीत दिनामो
येकटारिनबर्ग (रशिया) : वरुणकुमार, सिमरनजितसिंह व विक्रमजित यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी एक गोलच्या जोरावर भारतीय ज्युनिअर हॉकी संघाने युरेशिया चषक हॉकी स्पर्धेत आपल्या पहिल्या लढतीत दिनामो स्टरोइटेल संघाचा ३-१ गोलने पराभव करून आपले विजयी अभियान सुरू केले.
शनिवारी रात्री झालेल्या या सामन्यात सुरुवातीला दोन्ही संघांनी जलद खेळ करण्यास सुरुवात केली. पण कोणत्याच संघाला गोल करण्यात यश आले नाही. पहिल्या
१५ मिनिटांत भारतीय संघाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा
त्यांना फायदा घेता आला
नाही. दिनामोचा गोलरक्षक द्रायनत्सिनने अफलातून गोलरक्षण करीत भारतीय खेळाडूंचे प्रयत्न हाणून पाडले. त्यानंतर दिनोमा संघालासुद्धा पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण त्यांनासुद्धा गोल करता आले नाहीत. मध्यंतरासाठी खेळ थांबला तेव्हा गोलशून्य बरोबरी होती.
विश्रांतीनंतर भारतीय संघाने आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. या वेळी भारताच्या आघाडीच्या फळीने काही चांगल्या चाली रचल्या. पण त्यांना यश आले नाही. ४४ व्या मिनिटाला दिनामो संघाच्या सर्कलमध्ये चेंडू असताना त्यांच्या खेळाडूकडून झालेल्या चुकीमुळे पंचांनी तांत्रिक कारणावरून भारतीय संघाला पेनल्टी किक बहाल केली. त्याचा पूर्ण फायदा भारताच्या वरुणकुमारने घेतला, कोणतीही चूक न करता त्याने चेंडू दिनामोच्या गोलजाळीमध्ये टाकत आपल्या संघाचा पहिला गोल केला. त्यानंतर एकाच मिनिटानंतर भारताच्या सिमरनजितसिंहने फिल्ड गोल करून आपल्या संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली.
५३ व्या मिनिटाला विक्रमजितसिंहने आपल्या संघाचा तिसरा गोल केला. दिनामो संघाच्या एल. अॅलेक्सांद्रने ५९ व्या मिनिटाला आपल्या संघाचा एकमेव गोल केला. शेवटी हा सामना भारताने ३-१
गोलने जिंकून आपले विजयी अभियान सुरू केले. (वृत्तसंस्था)