डीसिल्वा, चंडीमल यांची दमदार शतकी खेळी
By admin | Published: August 15, 2016 04:20 AM2016-08-15T04:20:19+5:302016-08-15T04:20:19+5:30
शानदार शतकाच्या जोरावर यजमान श्रीलंकाने आॅस्टे्रलियाविरुध्द तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावामध्ये ३५५ धावांची मजल मारली
कोलोंबो : धनंजय डीसिल्वा (१२९) आणि यष्टीरक्षक दिनेश चंडिमल (१३२) यांच्या शानदार शतकाच्या जोरावर यजमान श्रीलंकाने आॅस्टे्रलियाविरुध्द तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावामध्ये ३५५ धावांची मजल मारली. यानंतर आॅसी संघाने दुसऱ्या दिवसअखेर १ बाद १४२ धावांची दमदार मजल मारली.
आॅस्टे्रलिया अजूनही लंकेपेक्षा २१४ धावांनी पिछाडीवर असून त्यांचे ९ फलंदाज शिल्लक आहेत. विशेष म्हणजे भरवशाचा आणि फॉर्ममध्ये असलेला आॅस्टे्रलियाचा सलामीवीर डेव्हीड वॉर्नर (११) स्वस्तात बाद झाला. त्याला लंकेचा शतकवीर धनंजय डीसिल्वाने बाद केले.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा शॉन मार्श (नाबाद ६४) आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ (नाबाद ६१) खेळपट्टीवर टिकून होते. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १२० धावांची नाबाद भागीदारी करुन आॅसीला सावरले. कर्णधार स्मिथने यावेळी ४४ सामन्यांत ४ हजार धावांचा टप्प पार केला. मार्शने १४१ चेंडूत १० चौकार मारले असून स्मिथने १०८ चेंडूत ५ चौकार व एक उत्तुंग षटकार ठोकला आहे.
तत्पूर्वी, चंडिमल आणि डीसिल्वा यांनी सहाव्या विकेटसाठी २११ धावांची जबरदस्त भागीदारी करुन संघाला प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर काढले. चंडिमलने ३५६ चेंडूत १३ चौकार व एका षटकारासह १३२ धावांची खेळी केली. तर, डीसिल्वाने २८० चेंडूत १८ चौकारांसह शानदार १२९ धावा फटकावल्या. आॅसीकडून वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने ६३ धावांत ५ बळी घेतले. तर आॅफस्पिनर नॅथान लिआॅननेही चांगला मारा करताना ११० धावांच्या मोबदल्यात ३ फलंदाज बाद केले. (वृत्तसंस्था)
>संक्षिप्त धावफलक
श्रीलंका (पहिला डाव) : १४१.१ षटकात सर्वबाद ३५५ धावा.
(दिनेश चंडिमल १३२, धनंजन डीसिल्वा १२९; मिशेल स्टार्क ५/६३,
नॅथन लिआॅन ३/११०)
आॅस्टे्रलिया (पहिला डाव) : ४३ षटकात १ बाद १४१ धावा (डेव्हीड वॉर्नर ११, शॉन मार्श खेळत आहे ६४, स्टीव्ह स्मिथ खेळत आहे ६१; धनंजन डीसिल्वा १/२०)