दत्तू भोकनाल पुरुष स्कल्समध्ये आॅलिम्पिकसाठी पात्र
By admin | Published: April 26, 2016 05:43 AM2016-04-26T05:43:48+5:302016-04-26T05:43:48+5:30
दत्तू भोकनालने सोमवारी फिसा आशियाई ओसनिया आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेत पुरुष एकेरी स्कल्स स्पर्धेच्या फायनलमध्ये रौप्यपदक पटकावताना आॅगस्टमध्ये होणाऱ्या रिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली
चुंग ज्यू (दक्षिण कोरिया) : भारताचा नौकायनपटू दत्तू भोकनालने सोमवारी फिसा आशियाई ओसनिया आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेत पुरुष एकेरी स्कल्स स्पर्धेच्या फायनलमध्ये रौप्यपदक पटकावताना आॅगस्टमध्ये होणाऱ्या रिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. २५ वर्षीय भोकनालने पात्रता स्पर्धेत दोन किलोमीटर अंतर ७ मिनिट ७.४९ सेंकद वेळेत पूर्ण करीत दुसरे स्थान पटकावले. रौप्यपदकाचा मानकरी ठरलेला भोकनाल रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरला. या स्पर्धेतील अव्वल स्थान खेळाडू रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरले.
भारतीय पुरुषांना डबल स्कल्स गटात आॅलिम्पिक पात्रता मिळवण्यात अपयश आहे. या गटात विक्रम सिंग व रूपेंद्र सिंग यांना अंतिम फेरीत पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. या गटात अव्वल तीन स्थानांवरील स्पर्धक आॅलिम्पिकसाठी पात्र ठरले.
भारतीय नौकायनपटूने या स्पर्धेत अंतिम फेरीत सुवर्णपदक पटकावण्यासाठी संघर्ष केला आणि आघाडी मिळवणाऱ्या अव्वल पाच खेळाडूंविरुद्ध कडवी झुंज दिली. अखेर कोरियाच्या डोंगयोंग किमने अखेरच्या टप्प्यात बाजी मारली आणि ७ मिनिट ५.१३ सेकंद वेळेसह अव्वल स्थान पटकावले.
भोकनालने २०१४ मध्ये राष्ट्रीय रोर्इंग चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्णपदके पटकावली होती.
यंदा चीनमध्ये आयोजित आशियाई स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. नाशिकमध्ये जन्मलेला भोकनाल सेनादलात कार्यरत असून,
पुण्याच्या आर्मी रोर्इंग नोडमध्ये (एआरएन) सराव करतो. या व्यतिरिक्त भोकनालने गेल्या वर्षी चीनमध्ये १६ व्या आशियाई
रोर्इंग चॅम्पियनशिपमध्ये पुरुष
एकेरी स्कल्समध्ये रौप्यपदक पटकावले होते.
भारतीय रोर्इंग महासंघाचे सचिव कॅप्टन गिरीश फडणीस यांनी आॅलिम्पिक पात्रता मिळवणाऱ्या भोकनालचे अभिनंदन केले. ते म्हणाले, ‘भोकनालने अनेक वर्षांपासून या क्रीडाप्रकाराला सुरुवात केली. गेल्या चार वर्षांपासून तो या खेळासोबत जुळलेला आहे. गेल्या वर्षी चीनमध्ये त्याने रौप्यपदक पटकावले होते, तर आता त्याने आॅलिम्पिक पात्रता मिळवली आहे. रिओमध्ये तो अव्वल १० मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरेल, अशी आशा आहे. आॅलिम्पिकसाठी तो कसून मेहनत घेईल, असा मला विश्वास आहे. कोरियाहून मायदेशी परतल्यानंतर त्याला प्रशिक्षणासाठी विदेशात पाठविण्याबाबत विचार करण्यात येईल.’ (वृत्तसंस्था)