डेव्हिड वॉर्नरचा नवा विक्रम, लंचआधीच ठोकलं शतक
By admin | Published: January 3, 2017 10:18 AM2017-01-03T10:18:09+5:302017-01-03T11:20:41+5:30
पाकिस्तानविरोधात सिडनीमध्ये खेळल्या जाणा-या मालिकेच्या तिस-या सामन्यातील पहिल्याच दिवशी डेव्हिन वॉर्नरने शतक पुर्ण केलं
Next
>ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. 3 - ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज डेव्हिड वॉर्नरने एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. पाकिस्तानविरोधात सिडनीमध्ये खेळल्या जाणा-या मालिकेच्या तिस-या सामन्यातील पहिल्याच दिवशी डेव्हिन वॉर्नरने शतक पुर्ण केलं. महत्वाचं म्हणजे पहिल्या दिवसाचा लंच होण्याआधीच डेव्हिड वॉर्नरने शतक ठोकत भीमपराक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये हा रेकॉर्ड करणारा तो पहिलाच खेळाडू आहे.
वॉर्नरने फक्त 78 चेंडूंमध्ये 17 चौकारांच्या मदतीने शतक पुर्ण केलं. यासाठी त्याला फक्त 118 मिनिटं लागली. डेव्हिड वॉर्नरच्या या तुफानी खेळासमोर पाकिस्तानी गोलंदाजांनी सपशेल हार पत्करली होती. कसोटी सामन्याच्या पहिल्याच सत्रात शतक करणारा वॉर्नर पाचवा खेळाडू ठरला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये हा रेकॉर्ड करणारा तो पहिलाच खेळाडू आहे. आपल्या शतकाचं रुपांतर मोठ्या धावसंख्येत करण्याची संधी मात्र वॉर्नरने गमावली. 113 धावांवर वॉर्नरने आपली विकेट गमावली. वहाब रियाजच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला.
वॉर्नरने लंचआधीच्या शेवटच्या ओव्हरमध्ये आपलं शतक पुर्ण केलं. डेव्हिड वॉर्नरच्या करिअरमधील हे 18 वं शतक ठरलं. सर डॉन ब्रॅडमॅन यांनादेखील ऑस्ट्रेलियात हा रेकॉर्ड करता आला नाही. मात्र इंग्लंडमधील हेडिंग्ले येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात त्यांनी लंचआधी शतक केलं होतं. त्या सामन्यात त्यांनी 334 धावांची खेळी केली होती.
सामन्यात पहिल्याच सत्रात शतक करण्याचा शेवटचा रेकॉर्ड 1976 मध्ये झाला होता. पाकिस्तानी फलंदाज माजिद खानने न्यूझीलंडविरोधात हा रेकॉर्ड केला होता. एका सत्रात शतक करणं डेव्हिड वॉर्नरसाठी तसं नवं नाही. याआधीही भारताविरोधात 2011 रोजी पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने फक्त 69 चेंडूत शतक केलं होतं.
कसोटी सामन्यात पहिल्या सत्रात शतक करणारे फलंदाज -
1902: 103* व्हिक्टर ट्रम्पर, ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, मॅनचेस्टर
1926: 112* चार्ल्स मेकार्टनी, इंग्लंडविरोधात, लीड्स
1930: 105* डॉन ब्रेडमैन, इंग्लंडविरोधात, लीड्स
1976: 108* माजिद खान, न्यूझीलंडविरोधात, कराची
2017: 100* डेव्हिड वॉर्नर. पाकिस्तानविरोधात, सिडनी