‘डेव्हिस कप’ प्रकाशझोतात
By admin | Published: August 29, 2016 01:53 AM2016-08-29T01:53:01+5:302016-08-29T01:53:01+5:30
स्पेनच्या मजबूत संघाविरोधात भारत डेव्हिस कपच्या सामन्याचे आयोजन प्रकाशझोतात करणार आहे.
नवी दिल्ली : स्पेनच्या मजबूत संघाविरोधात भारत डेव्हिस कपच्या सामन्याचे आयोजन प्रकाशझोतात करणार आहे. दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनने पुढील महिन्यात होणारा विश्व ग्रुप प्ले आॅफ सामना प्रकाशझोतात करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना प्रकाशझोतात आयोजित करण्यात येईल.
पहिल्या दिवशी १६ सप्टेंबरला दोन एकेरी सामने सायंकाळी पाच वाजता सुरू होतील, तर दुहेरीची लढत पुढच्या दिवशी सायंकाळी होणार आहे. अखेरच्या दिवशी सायंकाळी दोन एकेरी सामने होतील.
डीएलटीएच्या कार्यकारी समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
सप्टेंबर २०१४ मध्ये सर्बियाच्या विरोधात झालेल्या विश्व ग्रुप प्ले आॅफचे सामने दुपारी तीन वाजता सुरू करण्यात आले होते. त्यामुळे भारताचे स्पेन विरोधातील सामने उशिरा सुरू केले जाऊ शकतात.
डीएलटीएच्या अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, ‘प्रेक्षकांनी हे सामने बघावे ही आमची इच्छा आहे. यामुळे भारतीय खेळाडूंचे मनोबल वाढेल. आम्ही यावर विचार केला की, कशा पद्धतीने अधिक लोकांना टेनिस स्टेडियममध्ये आणता येईल. भारतीय प्रेक्षकांच्या सोयीसाठी आम्ही वेळ निवडत आहोत. स्पेन आणि भारताच्या स्टार खेळाडूंचा खेळ पाहण्यापासून प्रेक्षकांना वंचित ठेवता येणार नाही.’
अधिकारी म्हणाले की, ‘सायंकाळी सामने सुरू झाल्याने खेळाडू आपल्या क्षमतेनुसार खेळ करू शकतील. आम्ही याबाबत खेळाडूंशी चर्चा केली आहे आणि त्यांच्या सहमतीनेच हा निर्णय घेण्यात आला आहे.’ हे सामने रोमांचक असतील, कारण स्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदाल याने म्हटले आहे की, भारत दौऱ्याचा त्याच्या कार्यक्रमात समावेश राहील.