डेव्हिस कप टेनिस: निवड समितीच्या बैठकीत लिएंडर पेसबाबत होणार चर्चा
By admin | Published: March 5, 2017 07:56 PM2017-03-05T19:56:05+5:302017-03-05T19:56:05+5:30
डेव्हिस कप टेनिस स्पर्धेत आशिया-ओसियाना गटात उझबेकिस्तान विरुद्धच्या लढतीसाठी भारतीय संघाची निवड
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - डेव्हिस कप टेनिस स्पर्धेत आशिया-ओसियाना गटात उझबेकिस्तान विरुद्धच्या लढतीसाठी भारतीय संघाची निवड सोमवारी होणार आहे. अखिल भारतीय टेनिस महासंघाच्या (एआयटीए) निवड समितीच्या सोमवारी होणाऱ्या बैठकीत सिनिअर खेळाडू लिएंडर पेसचे भारतीय डेव्हिस कप संघातील स्थान चर्चेचा मुख्य मुद्दा आहे. याव्यतिरिक्त एकेरीसाठी दोन खेळाडूंची निवड करायची की तीन खेळाडूंना संधी द्यायची, याबाबत चर्चा होणार आहे.
न्यूझीलंड विरुद्धच्या लढतीत अखेरच्या क्षणी माघार घेणारे साकेत मयनेनी व सुमित नागल यांनी दुखापतीमुळे निवडीसाठी उपलब्ध नसल्याचे कळवले आहे. त्यामुळे रामकुमार रामनाथन, युकी भांबरी व रोहन बोपन्ना यांची निवड निश्चित मानली जात आहे. तंदुरस्त असेल तर मयनेनी एकेरी व दुहेरीमध्ये खेळू शकतो. पण आता एकेरीच्या तीन खेळाडूंची निवड करायची की दुहेरीच्या दोन खेळाडूंची निवड करायची, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
निवड समितीने एकेरीच्या तीन खेळाडूंची निवड करण्याचा निर्णय घेतला तर बोपन्नाची निवड पक्की आहे. कारण तो विश्व मानांकनामध्ये २४ व्या स्थानी आहे. भारतीय खेळाडूंमध्ये त्याचे सर्वोत्तम मानांकन आहे. बोपन्नाला गेल्या लढतीत वगळण्यात आले होते. वेगवान सर्व्हिससाठी ओळखल्या जाणाऱ्या दुहेरीतील या खेळाडूच्या पुनरागमनाची शक्यता आहे.
बोपन्नाने अलीकडेच संपलेल्या दुबई एटीपी ५०० स्पर्धेत चांगली कामगिरी केली. या स्पर्धेत त्याचा सहकारी मार्सिन मातकोवस्कीच्या साथीने तो उपविजेता ठरला होता. बोपन्ना-मातकोवस्की जोडीने या स्पर्धेत उपांत्य फेरीत पेस व त्याचा सहकारी गार्सिया गुलिरेमो लोपेज यांचा पराभव केला होता.
मानांकनाचा निकष लावला तर पेसला संघातील स्थान गमवावे लागणार असल्याचे निश्चित आहे. ६२ व्या मानांकनावर असलेला पेस निवडीचा विचार केला तर चौथ्या क्रमांकावर आहे. पेसच्या तुलनेत दिविज शरण (५४) व पूरव राजा (५६) आघाडीवर आहेत.
जर बोपन्ना व पेस या दोघांचीही निवड झाली तर संघाकडे एकेरीसाठी केवळ युकी व रामकुमार हे खेळाडू असतील. एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला आणि गरज भासली तर बोपन्ना किंवा पेस यांच्यापैकी एकही खेळाडू एकेरीमध्ये पाच सेट््स खेळू शकत नाही.
समितीने एकेरीमध्ये दोनच खेळाडूंची निवड करण्याचा निर्णय घेतला तर डावुखरा शरण व राजा यांच्याकडे यावेळी डोळेझाक करण्यात येणार नसल्याचे संकेत मिळत अहे. कारण एआयटीएच्या अधिकाऱ्यांनी संघात युवा खेळाडूंना संधी देण्यास उत्सुक असल्याचे वक्तव्य केले आहे.
त्यामुळे पेसला आपले स्थान गमवावे लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याला डेव्हिस कप स्पर्धेत दुहेरीमध्ये विक्रमी ४३ वा सामना जिंकण्यासाठी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.
एकेरीतील तिसऱ्या खेळाडूसाठी दोन दावेदार आहेत. त्यात तामिळनाडूचा प्रजनेश गुणेश्वरन व एन श्रीराम बालाजी यांचा समावेश आहे.
गुणेश्वरन पुणे येथे न्यूझीलंड विरुद्धच्या लढतीदरम्यान संघात होता. त्यात भारताने ४-१ ने विजय मिळवला होता.
आशिया ओसियाना गटातील दुसऱ्या फेरीची लढत महेश भूपतीसाठी नॉन प्लेर्इंग कॅप्टन म्हणून पहिली लढत असेल. हा सामना ७ ते ९ एप्रिल या कालावधीत बेंगळुरूमध्ये खेळल्या जाणार आहे. या लढतीतील विजेता संघ विश्व ग्रुप प्ले आॅफसाठी पात्र ठरेल.
जागतिक क्रमवारीत ६८ व्या स्थानावर असलेला डेनिस इस्तोमिन उझ्बेकिस्तान संघाचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे. इस्तोमिनने यंदा सुरुवातीला आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये नोव्हाक जोकोव्हिचचा पराभव करीत धक्कादायक निकाल नोंदवला होता. त्याने पहिल्या फेरीत आपल्या संघाला कोरियाविरुद्ध ३-१ ने विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याने एकेरीच्या दोन्ही लढतीत विजय मिळवला होता आणि त्यानंतर संजार फेजिएव्हच्या साथीने दुहेरीतही सरशी साधत उझ्बेकिस्तानला विजय मिळवून दिला होता. (वृत्तसंस्था)