डे-नाईट क्रिकेट स्पर्धेचा समारोप
By admin | Published: January 17, 2017 03:22 AM2017-01-17T03:22:01+5:302017-01-17T03:22:01+5:30
ठाणे लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष निशांत भगत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करसन सीताराम भगत स्मृती चषक २०१७ची रविवारी सांगता झाली.
नवी मुंबई : जिल्हा काँग्रेस कमिटी व इच्छापूर्ती स्पोर्ट्स क्लब तसेच ठाणे लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष निशांत भगत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करसन सीताराम भगत स्मृती चषक २०१७ची रविवारी सांगता झाली. वाशीगावातील शिवतीर्थ मैदानात आयोजित स्पर्धेला खेळाडूंचा तसेच क्रीडा रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेच्या माध्यमातून एक लढा- नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी असा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाचे ‘लोकमत’ हे माध्यम प्रायोजक होते.
रविवारी झालेल्या सांगता सोहळ््यात क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आले. यामध्ये मालिकावीर,उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. या स्पर्धेमध्ये नवी मुंबई मर्यादित तसेच ४० प्लस या प्रकारचे तब्बल २४ संघांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ््याला महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य सत्यजित तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रथम पारितोषिक विजेत्याला २ लाख व चषक देऊन गौरविण्यात आले. तर द्वितीय पारितोषिक विजेत्याला १ लाख रुपये,तृतीय पारितोषिक विजेत्याला ५० हजार व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. ४० प्लस मर्यादित क्रिकेट सामन्यातील प्रथम पारितोषिक विजेत्याला १० हजार आणि द्वितीय पारितोषिक विजेत्याला ५ हजार रुपये व सन्मानचिन्ह दिले.
मकरसंक्रांतीच्या निमित्ताने याठिकाणी पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.चिमुरड्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटातील व्यक्ती या महोत्सवात सहभागी झाल्या. प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि.बा.पाटील यांच्या जयंतीनिमित यांच्या कार्याची चित्रफीत याठिकाणी दाखविण्यात आली. नवी मुंबई पोलीस वाहतूक विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतूक सुरक्षे, वाहतूक नियमांविषयी जनजागृती करणारी चित्रफीत उपस्थितांना दाखवण्यात आली.
या कार्यक्रमाला लातूर लोकसभा अध्यक्ष धीरज देशमुख, युवा नेते परेश ठाकूर, वैभव नाईक , दीप भानुशाली, किस्मत पाटील, रोशन थॉमस,नगरसेविका फशीबाई भगत, वैजयंती भगत, रुपाली भगत, संजय यादव, संतोष पाटील, विनोद विसारिया, दीपक तांबे, राजेश पाटील, बालाजी यादव, विजय वाळुंज, अजय वाळुंज, अंजली वाळुंज आदी मान्यवर व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)