डिव्हिलिअर्स पुन्हा एकदा बेस्ट, वनडे क्रमवारीत ठरला अव्वल
By admin | Published: March 10, 2017 04:54 PM2017-03-10T16:54:11+5:302017-03-10T16:54:11+5:30
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जारी केलेल्या एकदिवसीय क्रमवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा धडाडीचा फलंदाज एबी डिव्हिलिअर्सने अव्वल स्थानावर कब्जा
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जारी केलेल्या एकदिवसीय क्रमवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा धडाडीचा फलंदाज एबी डिव्हिलिअर्सने अव्वल स्थानावर कब्जा केला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील कामगिरीच्या बळावर त्याने पुन्हा एकदा अव्वल स्थान गाठलं. या मालिकेत त्याने 262 धावा केल्या होत्या त्यामध्ये वेलिंगटन वनडेमध्ये केलेल्या 85 धावांच्या अप्रतिम खेळीचाही समावेश आहे. तर भारतीय कर्णधार विराट कोहली तिस-या स्थानावर कायम आहे.
ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला डिव्हिलिअर्सच्या चांगल्या कामगिरीचा फटका बसला. वॉर्नरची दुस-या स्थानावर पिछेहाट झाली आहे. डिव्हिलिअर्सला 875 रेटिंग असून तिस-या स्थानावरील कोहलीच्या तो 23 गुणांनी पुढे आहे तर वॉर्नरपेक्षा 4 गुणांनी पुढे आहे.
या क्रमवारीत भारताचा रोहित शर्मा (12) आणि महेंद्र सिंह धोनी (13) आपल्या आधीच्या स्थानावर कायम आहेत.
आयसीसी क्रमवारीत अश्विन-जडेजाने रचला इतिहास, दोघंही अव्वल-
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जारी केलेल्या कसोटी क्रमवारीमध्ये भारताच्या फिरकी जोडीने इतिहास रचला आहे. रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा या दोघांनीही आयसीसीच्या क्रमवारीत संयुक्तरित्या अव्वल स्थान काबिज केलं आहे. आयसीसी क्रमवारीत दोन्ही फिरकी गोलंदाजांनी सारखे गुण मिळवून अव्वल स्थान गाठण्याची ही पहिलीच वेळ ठरली. आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा दोघांनाही 892 रेटिंग मिळाले आहेत. त्यांच्या खालोखाल ऑस्ट्रेलियाचा जॉश हेझलवूड (863) आणि त्यानंतर श्रीलंकेचा रंगना हेराथ (827) आहे. बंगळुरूमध्ये झालेल्या दुस-या कसोटीत अश्विनने 8 विकेट घेतल्या होत्या तर जडेजाने 7 विकेट घेतल्या होत्या.
यापुर्वी एप्रिल 2008 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन आणि मुथय्या मुरलीधरन संयुक्तरित्या एक नंबरवर होते. पण दोन फिरकी गोलंदाजांनी संयुक्तरित्या अव्वल स्थान मिळवण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
मात्र, फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीला कांगारूंविरूद्धच्या दोन सामन्यात लवकर बाद होण्याचा फटका बसला. दुस-या स्थावरून तिस-या स्थानावर त्याची घसरण झाली. ऑस्ट्रेलियाचा स्मिथ या क्रमवारीत अव्वल आहे तर त्याच्याखाली न्यूझीलंडच्या केन विल्यमसनचा नंबर आहे.
दुसरीकडे, अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत आर.अश्विनची एका स्थानाने घसरण होऊन तो दुस-या क्रमांकावर आला आहे. बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसनने पहिलं स्थान मिळवलं असून त्याचे 441 रेटिंग आहेत.