डिविलियर्स करतोय निवृत्तीचा विचार
By admin | Published: June 26, 2017 02:42 PM2017-06-26T14:42:15+5:302017-06-26T15:26:23+5:30
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिविलियर्सचा आजच्या घडीला जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये समावेश होतो.
Next
ऑनलाइन लोकमत
डरबन, दि. 26 - दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिविलियर्सचा आजच्या घडीला जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये समावेश होतो. मैदानावरील त्याचा खेळ डोळयाचे पारणे फेडणारा असतो. वनडे, टी-20 असो किंवा कसोटी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये डिविलियर्सची आक्रमक फलंदाजी क्रिकेट चाहत्यांसाठी एक पर्वणी असते. पण आता हाच गुणवान खेळाडू निवृत्तीच्या विचारात आहे.
नुकत्याच संपलेल्या इंग्लंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या ट्वेंटी-ट्वेंटीच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा 2-1ने पराभव झाला. डिविलियर्सच्या कॅप्टन्सीमध्ये खेळताना सध्या दक्षिण आफ्रिकेचे प्रदर्शन घसरले आहे. एकदिवसीय मालिकेतही इंग्लंडने त्यांचा पराभव केला. नेमक्या याच कारणामुळे डिविलियर्सच्या मनात निवृत्तीचा विचार घोळत असावा. येत्या 6 जुलैपासून इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका सुरु होत आहे. पण डिविलियर्सने विश्रांती घेतल्याने तो या मालिकेत खेळणार नाही.
सप्टेंबर महिन्यात बांगलादेशचा संघ दक्षिण आफ्रिका दौ-यावर जाणार आहे. त्यापूर्वी ऑगस्ट महिन्यात डिविलियर्स दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाबरोबर चर्चा करणार आहे. ऑगस्ट महिन्यात माझी दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाच्या पदाधिका-यांबरोबर चर्चा होईल. त्यामध्ये माझ्या क्रिकेट करीयरचा निर्णय होईल असे डिविलियर्सने सांगितले.
कसोटी क्रिकेटमध्ये डिविलियर्सने 106 सामन्यात 8 हजार पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यात 21 शतकांचा समावेश आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही भारताकडून पराभूत झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले. दक्षिण आफ्रिकेचा संघ अनेक गुणवान खेळाडूंनी भरलेला आहे. जेतेपदाच्या दावेदारांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. पण मोक्याच्या क्षणी ढेपाळण्याचा त्यांचा इतिहास आहे.
मोठया स्पर्धांमध्ये चोकर्सचा शिक्का त्यांना पुसून टाकता आलेला नाही. 1996, 1999 या वर्ल्डकप स्पर्धांमध्ये ते जेतेपदाचे प्रबळ दावेदार होते. पण उपांत्यफेरीत चटका लावून जाणारा पराभव झाला. डिविलियर्सला दक्षिण आफ्रिकेचे अपूर्ण राहिलेले वर्ल्डकप विजयाचे स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा आहे. दक्षिण आफ्रिकेला वर्ल्डकप जिंकून द्यायचा किंवा त्यासंघाचा भाग रहायचे हे आपले स्वप्न असल्याचे त्याने सांगितले. 2015 वर्ल्डकपच्या उपांत्यफेरीत न्यूझीलंडकडून दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला होता.