मालिका विजयाचा निर्धार
By Admin | Published: August 9, 2016 03:43 AM2016-08-09T03:43:54+5:302016-08-09T03:43:54+5:30
पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अखेरच्या दिवशी विंडीजच्या फलंदाजांच्या शानदार फलंदाजीमुळे चकित झालेल्या भारतीय संघाला
सेन्ट ल्युसिया : पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अखेरच्या दिवशी विंडीजच्या फलंदाजांच्या शानदार फलंदाजीमुळे चकित झालेल्या भारतीय संघाला आता आज, मंगळवारपासून प्रारंभ होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात गोलंदाजांकडून शानदार कामगिरीची आशा आहे. भारतीय संघ या लढतीत सरशी साधत चार सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्यास उत्सुक आहे.
युवा फलंदाज रोस्टन चेजने शतकी खेळी करीत विंडीजला दुसरा कसोटी सामना अनिर्णीत राखून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय संघ मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. आता भारतीय संघ डॅरेन सॅमी स्टेडियममध्ये मालिका विजय साकारण्यास प्रयत्नशील आहे. या मैदानावर आतापर्यंत केवळ चार कसोटी सामने खेळल्या गेले आहेत. भारताने यापूर्वी २००६ मध्ये येथे अनिर्णित सामना खेळला होता. पहिल्या तासभराच्या खेळानंतर खेळपट्टीतील आर्द्रता संपुष्टात येईल. त्यामुळे खेळपट्टी नेहमीप्रमाणे फलंदाजांसाठी अनुकूल राहण्याचे संकेत मिळत आहेत.
भारताने मालिकेत आघाडी घेतली असली फिरकीपटूंमध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्णधार कोहली दुसरा फिरकीपटू म्हणून रवींद्र जडेजाला संधी देण्याची शक्यता आहे. मिश्राच्या तुलनेत तळाच्या फळीत जडेचा चांगला फलंदाजही आहे. जर संघव्यवस्थापनाने तीन फिरकीपटूंना खेळविण्याचा निर्णय घेतला तर यादवच्या स्थानी जडेजाला संधी मिळू शकते, पण अशी शक्यता धुसर आहे.
भारतासाठी मुरली विजयचा फिटनेस चिंतेचा विषय आहे. रविवारी त्याने नेट््समध्ये वेगवान गोलंदाजांविरुद्ध फलंदाजीचा सराव केला नाही. दुसऱ्या बाजूला विंडीजला सलामी जोडीबाबत अद्याप ठोस पयार्य सापडलेला नाही. शाई होपला राजेंद्र चंद्रिकाच्या स्थानी संधी मिळण्याची शक्यता आहे. होपने सेन्ट किट््समध्ये खेळल्या पहिल्या सराव सामन्यात भारताविरुद्ध शतकी खेळी केली होती. कर्णधार होल्डरला होपकडून अशाच कामगिरीची आशा राहील.
विंडीजच्या आघाडीच्या फळीला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. दुसऱ्या कसोटी सामन्यात तळाच्या फलंदाजांनी उपयुक्त भागीदारी केल्यामुळे सामना अनिर्णीत राखण्यात यश आले. पराभवाचे सावट असताना सामना अनिर्णीत राखण्यात यशस्वी ठरल्यामुळे विंडीज संघाचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळाली आहे. (वृत्तसंस्था)
प्रतिस्पर्धी संघ
भारत :- विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, के.एल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रिद्विमान साहा, आर.अश्विन, अमित मिश्रा, रविंद्र जडेजा, स्टुअर्ट बिन्नी, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, उमेश यादव आणि ईशांत शर्मा.
वेस्ट इंडिज :- जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रेथवेट, शाई होप, डॅरेन ब्राव्हो मर्लोन सॅमुअल्स, जेरमाइन ब्लॅकवुड, रोस्टन चेज, लियोन जॉन्सन, शेन डोरिच, देवेंद्र बिशू, कार्लोस ब्रेथवेट, शेनोन गॅब्रियल, मिगुएल कुमिन्स आणि अलजारी जोसेफ.
सामन्याची वेळ : भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७.३० पासून.
पाच गोलंदाजांच्या रणनीतीचे शमीने केले समर्थन
सेन्ट ल्युसिया : वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात पाच स्पेशालिस्ट गोलंदाजांचा समावेश असतानाही विजयाचा मार्ग प्रशस्त करता आला नाही, पण वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने कर्णधार कोहलीच्या पाच गोलंदाजांसह खेळण्याच्या रणनीतीचे समर्थन केले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना शमी म्हणाला,‘तळाच्या फलंदाजांना बाद करण्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. जर संघात पाच गोलंदाज असेल तर चार-पाच षटकांच्या स्पेनंतर ८-१० षटके विश्रांतीची संधी मिळते. त्यानंतर पुन्हा त्याच जोमाने गोलंदाजी करता येते. अंतिम अकरामध्ये आमच्याकडे दोन चांगले फिरकीपटू आणि तीन वेगवान गोलंदाज आहेत. हीच रणनीती कायम राखण्याचा प्रयत्न राहील.’
दुसऱ्या कसोटी सामन्यात विंडीजची दुसऱ्या डावात ४ बाद ४८ अशी अवस्था असताना अखेरच्या दिवशी भारतीय गोलंदाजांना सहा बळी घेता आले नाही. याबाबत बोलताना शमी म्हणाला,‘ज्यावेळी झटपट बळी मिळवले जातात त्यावेळी सामन्यात एक मोठी भागीदारी होते. याचा अर्थ आम्ही चुका केल्या असा होत नाही. ते चांगले खेळले. खेळपट्टीही पाटा होती. परिस्थिती फलंदाजीसाठी अनुकूल होती आणि त्यांची दुसऱ्या डावातील फलंदाजी प्रशंसेस पात्र आहे. त्यांनी याची पुनरावृत्ती करू नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’ (वृत्तसंस्था)