जागतिक स्पर्धेतील प्रवेशाचा निर्धार
By admin | Published: July 5, 2017 01:37 AM2017-07-05T01:37:58+5:302017-07-05T01:37:58+5:30
‘डायमंड लीग नक्कीच महत्त्वाची स्पर्धा होती. परंतु, भालाफेक प्रकारात अव्वल तीन क्रमांकामध्ये येणं हे माझे मुख्य लक्ष्य नव्हते. या
रोहित नाईक/लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘डायमंड लीग नक्कीच महत्त्वाची स्पर्धा होती. परंतु, भालाफेक प्रकारात अव्वल तीन क्रमांकामध्ये येणं हे माझे मुख्य लक्ष्य नव्हते. या स्पर्धेत अनेक चॅम्पियन्स खेळाडू होते. त्यांच्यापुढे मला माझी क्षमता आजमवायची होती. स्पर्धेतील माझ्या कामगिरीवर मी खूष आहे, असे ८४.६७ मीटरची फेक करुन पाचव्या स्थानी राहिलेल्या नीरजने लोकमतला सांगितले.
नीरज म्हणाला, ‘डायमंड लीगने मला खूप शिकवले. जागतिक दर्जाच्या खेळाडूंचे जवळून निरिक्षण करण्याची संधी मिळाली. हे खेळाडू स्वत:वर जास्त दबाव येऊ देत नाही. त्यांचे मुख्य लक्ष्य सर्वोत्तम कामगिरीचे असते. महत्त्वाची बाब म्हणजे ते खेळाचा आनंद घेतात. त्यामुळे स्पर्धेची परिस्थिती चांगल्या
पध्दतीने हाताळण्यात त्यांना यश
येते. अनेकांनी माझ्या कामगिरीचे कौतुक केले तेव्हा आत्मविश्वास वाढला. जागतिक दर्जाच्या खेळाडूंकडून होत असलेल्या कौतुकाचा आनंद वेगळा होता.
‘अगामी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी माझी कसून तयारी सुरु आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व माझ्याकडे सोपविले असल्याने मी सज्ज असून खूप उत्सुकही आहे. या स्पर्धेत
सुवर्ण पदक पटकावून जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत थेट प्रवेश करण्याचे माझे मुख्य लक्ष्य आहे, असे भारतीय अॅथलेटिक्स संघाचा कर्णधार आणि भालाफेकीमध्ये ज्यूनिअर विश्वविक्रम रचणाऱ्या नीरज चोप्राने सांगितले.
नुकताच पॅरिस येथे झालेल्या प्रतिष्ठेच्या डायमंड लीग स्पर्धेद्वारे नीरजने वरिष्ठ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदार्पण केले. भुवनेश्वर येथे ६ ते ९ जुलै दरम्यान रंगणाऱ्या आशियाई अजिंक्यपदमध्ये स्वत:ची छाप पाडण्यास सज्ज असलेल्या नीरजने म्हटले की, ‘लहानपणापासून माझे देशासाठी खेळण्याचे स्वप्न होते
आणि आशियाई स्पर्धेत मी भारताचे नेतृत्व करणार, यासारखा दुसरा आनंद नाही. अनेक नावाजलेले खेळाडू असूनही कर्णधार म्हणून माझी निवड झाली, यासाठी मी स्वत:ला नशिबवान मानतो.’
डोपिंगसारख्या घटनांपासून दूर राहण्यासाठी मी खबरदारी घेतोय. रोजच्या खाण्याच्या पदार्थांशिवाय इतर पदार्थ मी टाळतो. मी कधी गोळ्या घेत नसल्याने अशा गोष्टींमुळे दूर असतो. डॉक्टरांच्या योग्य मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सल्ल्यानुसार औषधे घेतली तर खेळाडू डोपिंगपासून नक्कीच दूर राहतील.
- नीरज चोप्रा
नीरजची कामगिरी..
२०१६ २० वर्षांखालील जागतिक स्पर्धेत ८६.४८ मीटरची फेक सुवर्ण पदकासह विश्वविक्रम नोंदवला.
२०१६ दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत ८२.२३ मीटरची फेक करुन सुवर्ण पदक पटकावले.