विराटने ऐनवेळी घेतला होता फिल्डिंगचा निर्णय
By admin | Published: June 22, 2017 12:08 PM2017-06-22T12:08:10+5:302017-06-22T12:09:40+5:30
टीम मीटिंगमध्ये टॉस जिंकल्यानंतर आधी फलंदाजी करण्यावर एकमत झालं असतानाही विराट कोहलीने मैदानावर ऐनवेळी निर्णय बदलत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीत पाकिस्तानने केलेला दारुण पराभव भारतीयांच्या प्रचंड जिव्हारी लागला आहे. भारतीय संघाच्या इतक्या खराब कामगिरीवर सर्व स्तरातून जोरदार टीका होत आहे. मात्र या पराभवामागे कर्णधार विराट कोहलीने ऐनवेळी घेतलेला निर्णय असल्याचं बोललं जात आहे. टीम मीटिंगमध्ये टॉस जिंकल्यानंतर आधी फलंदाजी करण्यावर एकमत झालं असतानाही विराट कोहलीने मैदानावर ऐनवेळी निर्णय बदलत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीचा नेमका हाच निर्णय संघाच्या पथ्यावर पडला, आणि एका मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं.
नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार विराट कोहलीचा हा निर्णय ऐकताच प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना आश्चर्याचा धक्काच बसला. विराट कोहली ड्रेसिंग रुममध्ये परतल्यानंतर कुंबळेने विराटकडे याबद्दल विचारणा केली. यावर विराट कोहलीने उलट उत्तर दिलं. यामुळे भारतीय संघामधील वातावरण बिघडलं, आणि त्याचा परिणाम खेळावर पहायला मिळाला. ज्यामुळे अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा दारुण पराभव केला.
याआधी जेव्हा सुरुवातीच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तानचा सामना झाला होता, तेव्हा भारताने प्रथम फलंदाजी करत 319 धावा केल्या होत्या. यानंतर मैदानात उतरलेल्या पाकिस्तानला भारतीय संघाने 164 धावांवर ऑल आऊट केलं होतं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची ढिसाळ फलंदाजी पाहता अंतिम सामन्यात एक मोठी धावसंख्या उभारली असती, तर त्याचा पाठलाग करणं त्यांना कठिण गेलं असतं.
यामुळेच भारतीय संघ व्यवस्थापनाने अंतिम सामन्यात टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र विराटने निर्णयाला बगल देत प्रथम गोलंदाजी करत असल्याचं जाहीर करुन टाकलं. उरली सुरली कसर विराट कोहलीने कुंबळेला उलट उत्तर देत भरुन टाकली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यामुळे ड्रेसिंग रुममधील वातावरण बिघडलं, ज्याचा परिणाम खेळावर झाला.
अंतिम सामन्यात फखर जमानने केलेल्या शतकाच्या आधारे पाकिस्तानने 338 धावांचा डोंगर उभा केला होता. धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाला पाकिस्तानने फक्त 158 धावांत गारद केलं, आणि 180 धावांनी दणदणीत पराभव केला.