डोक्यावरील वस्त्रबंदीचा निर्णय फिबाने बदलला
By admin | Published: May 10, 2017 12:54 AM2017-05-10T00:54:51+5:302017-05-10T00:54:51+5:30
विश्वचषक बास्केटबॉल संघटना फिबाने खेळाडूंच्या डोक्यावर बांधण्यात येणाऱ्या वस्त्रांसंदर्भातील बंदीच्या निर्णयात बदल केला आहे.
मुंबई : विश्वचषक बास्केटबॉल संघटना फिबाने खेळाडूंच्या डोक्यावर बांधण्यात येणाऱ्या वस्त्रांसंदर्भातील बंदीच्या निर्णयात बदल केला आहे. यामुळे भारतामधील शीख खेळाडूंना चीनमध्ये होणाऱ्या फिबा बास्केटबॉल विश्वचषक २०१९ पात्रता फेरीत खेळता येईल.
हा वादग्रस्त नियम बदलण्याचा निर्णय ४ मे रोजी फिबाच्या पहिल्या मध्यावधीत काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी भारताचे शीख खेळाडू अमरज्योत आणि अमृतपाल सिंह यांना २०१४ साली चीनमध्ये वुहान येथे झालेल्या आशिया चषक स्पर्धेपूर्वी आपली पगडी काढावी लागली होती.
१३९ राष्ट्रीय संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या फिबा काँग्रेसच्या बैठकीत सर्वानुमते या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. यात खेळाडूंना आपल्या डोक्यावरील वस्त्र म्हणजे पगडी, हिजाब आणि किप्पा परिधान करून खेळण्याची परवानगी असेल. तीन वर्षांपूर्वी फिबाने आपल्या अधिकृत बास्केटबॉल नियमात २०१४ च्या अंतर्गत ४.४.२ अनुसार कोणताही खेळाडू मैदानावर पगडी, हिजाब, केसांच्या सजावटीचे साहित्य अथवा दागिने घालून खेळणार नाही, याचा समावेश केला होता. या निर्णयावर टीका झाली.