लंकेचा यूएईविरुद्ध विजयाचा निर्धार
By admin | Published: February 25, 2016 03:51 AM2016-02-25T03:51:21+5:302016-02-25T03:51:21+5:30
स्टार खेळाडूंच्या पुनरागमनामुळे मनोधैर्य उंचावलेल्या श्रीलंका संघाला आशिया कप टी-२० स्पर्धेत पहिल्या रॉऊंड रॉबिन लीग सामन्यात गुरुवारी संयुक्त अरब अमिरातीच्या
मिरपूर : स्टार खेळाडूंच्या पुनरागमनामुळे मनोधैर्य उंचावलेल्या श्रीलंका संघाला आशिया कप टी-२० स्पर्धेत पहिल्या रॉऊंड रॉबिन लीग सामन्यात गुरुवारी संयुक्त अरब अमिरातीच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
श्रीलंका संघात कर्णधार लसिथ मलिंगा आणि कसोटी कर्णधार अँजेलो मॅथ्यूज यांचे पुनरागमन झाले आहे. दुखापतग्रस्त असल्यामुळे या दोन्ही खेळाडूंना भारताविरुद्धच्या मालिकेत सहभागी होता आले नव्हते. मलिंगा व अष्टपैलू मॅथ्यूज यांच्या पुनरागमनामुळे श्रीलंकेची गोलंदाजीची बाजू मजबूत झाली आहे. यूएईने स्पर्धेपूर्वी ४ संघांच्या पात्रता स्पर्धेत जेतेपद पटकावून मुख्य फेरीत प्रवेश मिळविला आहे. डावखुरा फिरकीपटू रंगना हेराथने श्रीलंका संघात पुनरागमन केले आहे. शेर-ए-बांगला स्टेडियममधील फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर हेराथकडून चमकदार कामगिरीची आशा आहे.
फलंदाजीमध्ये तिलकरत्ने दिलशान, मॅथ्यूज, दिनेश चांदीमल, चामरा कापुगेदरा आणि थिसारा परेरा यांच्यावर भिस्त राहील. गोलंदाजीमध्ये मलिंगाच्या साथीला नुवान कुलशेखरा व दुष्मंता चामिरा राहतील. फिरकीची जबाबदारी सचित्रा सेनानायके आणि हेराथ हे सांभाळतील.
यूएई संघाला या स्पर्धेच्या निमित्ताने आशियातील दिग्गज संघांमध्ये स्थान मिळविण्याची संधी मिळाली आहे. पात्रता स्पर्धेत यूएईने अफगाणिस्तान, हाँगकाँग आणि ओमान या संघांचा पराभव
केला होता. वेगवान गोलंदाज
नवीदने ७ बळी घेतले होते, तर आघाडीच्या फळीतील फलंदाज मोहंमद शहजादने १११ धावा फटकावल्या होत्या. (वृत्तसंस्था)
प्रतिस्पर्धी संघ
श्रीलंका : लसिथ मलिंगा (कर्णधार), अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चांदीमल, तिलकरत्ने दिलशान, निरोशान डिकवेल्ला, शेहन जयसूर्या, मिलिंदा सिरीवर्धना, दासून शनाका, चामरा कापुगेदरा, नुवान कुलशेखरा, दुष्मंता चामिरा, थिसारा परेरा, सचित्रा सेनानायके, रंगना हेराथ, जेफ्री वाँडरसे.
यूएई : अमजद जावेद (कर्णधार), अहमज राजा, फहाद तारिक, फरहान अहमद, मोहंमद नावेद, मोहंमद शहजाद, मोहंमद कलीम, मोहंमद उस्मान, स्वप्निल पाटील, कादीर अहमद, रोहन मुस्तफा, सकलिन हैदर, शैमान अन्वर, उस्मान मुश्ताक, झहीर मकसूद.